www.24taas.com, झी मीडिया, ढाका
जमात-ए-इस्लामी हा बांग्लादेशातील सर्वात मोठा कट्टर उजव्या विचारसरणीचा पक्ष बेकायदेशीर असल्याचा निर्णय ढाका उच्च न्यायालयाने दिला. तसेच या पक्षाला निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निकालामुळे देशातील शक्तिशाली मूलतत्त्ववादी पक्षाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे या पक्षाचे असित्वच संपुष्टात आले आहे.
न्यायालयीन समितीचे प्रमुख न्या. मोअज्जम हुसेन यांनी जमात ए इस्लामी बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयीन समितीचा हा निर्णय जाहीर करण्यात आला. बहुमताने हा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय जमात ए इस्लामी हा राजकीय पक्ष आहे काय? असेल तर त्याची नोंदणी वैध आहे काय? अशी विचारणा करणार्यार याचिकेवर देण्यात आला आहे.
जमात ए इस्लामीला निवडणूक आयोगाने दिलेली नोंदणी बेकायदेशीर ठरेल, असे न्या. हुसेन यांनी जाहीर केले. या निकालामुळे जमात ए इस्लामीला या वर्षअखेरीस होणारी संसदेची निवडणूक लढविता येणार नाही. न्या. हुसेन, न्या. इनायतूर रहिम आणि काझी रेझा उल हक यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केला.
बांगलादेशातील तारीकत फेडरेशनचे सचिव रिझाउल हक चांदपुरी आणि अन्य २४ जणांनी २५ जानेवारी २००९ मध्ये एक याचिका दाखल केली होती. तारीकत गटातर्फे सुफी तत्त्वज्ञानावर प्रवचने दिली जातात. तसेच धर्मनिरपेक्षतेचा प्रसार केला जातो. जमात ए इस्लामी हा धार्मिक गट असून त्यांचा बांगलादेशच्या स्वातंत्र्यावर आणि सार्वभौमत्वावर विश्वाचस नाही. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऑर्डर कायद्यांतर्गत जातीयवादी संघटना राजकीय पक्ष ठरू शकत नाही, असे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.
दरम्यान, बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या पक्षाचा प्रमुख सहकारी पक्ष आहे. जमात ए इस्लामी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.