... आणि पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलं!

हेग स्थित आंतरराष्ट्रीय पंचायत न्यायालयानं किसनगंगा हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टच्या संदर्भात भारताच्या बाजूनं निर्णय दिलाय... त्यामुळे पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 19, 2013, 03:20 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
हेग स्थित आंतरराष्ट्रीय पंचायत न्यायालयानं किसनगंगा हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टच्या संदर्भात भारताच्या बाजूनं निर्णय दिलाय... त्यामुळे पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायतीनं भारताचा पक्ष स्वीकारून काश्मीरमधल्या नीलम नदीवर भारताला जल नियंत्रणाला परवानगी दिलीय. यामुळे भारताला हे पाणी वापरून ३३० मेगावॅट वीजनिर्मिती करणं शक्य होणार आहे.
परदेश मंत्रालयानं सोमवारी रात्री उशीरा प्रसारित केलेल्या एका पत्रात, ‘या निर्णयानं भारताच्या धोरणांना पाठिंबाच दिलाय तसंच भारतानं सिंधू जल नियमांचं नेहमीच पालन केल्याचंही यामुळे सिद्ध झालंय’ असं म्हणत आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलंय.

मुख्य बाब म्हणजे, पाकिस्ताननं भारतावर सिंधू नदीच्या प्रवाहाला अडवून पाणी चोरल्याचा आणि दोन्ही देशांमध्ये सिंधू नदीच्या जलकराराचा भंग केल्याचा आरोप केला होता तसंच भारताच्या योजनेला स्थगिती देण्याची मागणीही केली होती. पण, आंतराराष्ट्रीय न्यायालयानं मात्र ती फेटाळून लावलीय त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडघशी पडावं लागलंय.