इस्लामाबाद : भारताकडून आपल्याला धोका आहे, अशी बोंब पाकिस्तान सुरूवातीपासूनच मारत आलाय.मात्र आता पाकिस्तानचा हा भयगंड हाताबाहेर गेल्याचं दिसतंय. कारण त्या देशातल्या नेत्यांना आता चक्क एका कार्टून कॅरेक्टरची भीती वाटू लागली आहे.
भारताविरुद्ध कायमच नापाक कारवाया करणा-या पाकिस्तानला आता हिंदी बोलणाऱ्या कार्टून्सचीही भीती वाटू लागलीये... लहानग्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या डोरेमॉनवरून सध्या पाकिस्तानात बराच वादंग सुरू आहे.
पाकिस्तानातल्या राजकीय पक्षांना सध्या डोरेमॉननं पछाडलंय... खास करून इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाला... कहर म्हणजे, त्यांच्या पक्षानं पंजाब राज्याच्या विधानसभेत डोरेमॉनवर बंदी घालण्याचा प्रस्तावच दिलाय.
मुलांचा अभ्यास आणि त्यांच्या तब्येतीवर या कार्टूनचा विपरित परिणाम होत असल्याचं या प्रस्तावात म्हटलंय... मुलं आता भारतीय हिंदी बोलू लागली आहेत, असाही आक्षेप आहे. हा भारताचा सांस्कृतिक हल्ला असल्याची बोंब इम्रान खान यांनी ठोकलीये.
याविरोधात पंजाबमधले आमदार मलिक तैमूर यांनी हे कार्टून दाखवणाऱ्या वाहिन्यांवरच बंदी आणावी, अशी मागणी केलीये. कार्टून वाहिन्या 24 तास दाखवण्याऐवजी काही तासच दाखवण्याचे आदेश द्यावेत, अशीही त्यांची मागणी आहे.
ही कार्टून्स भारतीय भाषा बोलत असल्यामुळे आपल्या समाजासाठी धोकादायक असल्याचं तैमूर यांचं म्हणणं आहे. उर्दू बोलली जाणाऱ्या घरांमध्ये इंग्रजीपेक्षा हिंदी डोरेमॉनलाच पसंती मिळतेय. त्यामुळे त्यांच्या रोजच्या बोलण्यातही मुलं हिंदीचा वापर करू लागली आहेत.
मात्र पाकिस्तानी जनतेमध्ये या प्रस्तावाविरोधात लगेचच नाराजीचा सूर उमटलाय... राजकीय पक्षांना जनतेनं लक्ष्य केलंय. इम्रान खान यांचा मुलांवर इतका राग का, असा प्रश्न लोक विचारतायत... सोशल मीडियावर एकानं म्हटलंय की,
इम्रान डोरेमॉनपेक्षा मोठा कार्टून आहे.
डोरेमॉनपेक्षा छोटा भीम जास्त खतरनाक आहे, त्यावर आधी बंदी आणा.. असं दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय.
चीन, अमेरिका, मॅक्सिको, रशिया, स्पेन, फ्रान्स, जर्मनीमध्ये यावर बंदी आहे. 2013 साली बांगलादेशचे दरवाजे ड़ोरेमॉनसाठी बंद झालेत. आपल्या देशातही डोरेमॉनवर बंदी आणण्याची मागणी करत याचिका दाखल करण्यात आलीये.
स्वतःच पोसलेला दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानवर उलटलाय... आर्थिक आघाडीवर आनंदी-आनंद आहे... आपल्या देशाची अवस्था सुधारायची सोडून तिथलं सरकार आणि पक्ष भारतविरोधी आचरटपणा करण्यातच धन्यता मानतात. डोरेमॉनला होत असलेला विरोध हे याचंच उदाहरण.