www.24taas.com,झी मीडिया,इस्लामाबाद
माजी पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. अली हैदर गिलानी असं त्याचं नाव आहे. तो पंजाब प्रांतातून निवडणुकीसाठी उभा होता.
आपल्या मुलाचे अपहण झाल्याचे युसूफ गिलानी यांनी म्हटले आहे. अली हा पीपल्स पार्टीचा उमेदवार होता. मुल्तान येथे अली याच्या ताफ्यावर फायरिंग करण्यात आले. हल्लेखोर दुचाकीवरून आणि करामधून आले असावे, असे पोलिसांनी सांगितले.
अज्ञात व्यक्तींनी शस्त्राचा धाक दाखवून मुल्तान येथील एका सभेतून अपहरण केले. यावेळी विरोध केला म्हणून अपहरणकर्त्यांनी गिलानींचे सचिव आणि एका रक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली, असे वृत्त जिओ टीव्हीने दिलेय.
हल्लेखोरांच्या हल्ल्यात अली यांचा सुरक्षा रक्षक ठार झाला. त्यानंतर अलीचे अपहरण करण्यात आले. यावेळी अली हैदर गिलीनी यांचे सचिवही या हल्ल्यात ठार झाल्याचे म्हटले जात आहे. हल्ल्यामध्ये पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन शस्त्रधारी मोटारसायकलवरुन वेगाने आले. त्यांच्या मागून एक कार देखील वेगाने सभेच्या ठिकाणी आली. नंतर शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. गिलानींच्या मुलाचे अपहरण झाल्यामुळे पाकमधील कायदा-सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.
अपहरणाची घटना घडल्यानंतर मुल्तान शहराबाहेर पडण्याच्या मार्गांवर नाकाबंदी केली आहे. येत्या ११ मे रोजी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. दरम्यान, पाकिस्तानी तालिबानने निवडणुकीदरम्यान घातपात करण्याचा इशारा दिला होता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.