चंदीगड : पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या भारतीय कृपाल सिंग यांचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात आलाय. परंतु, कृपाल सिंग यांच्या मृतदेहातून हृदय, पोटाच्या आतड्याचा भाग आणि जठर असे अनेक अवयव मात्र गायब आहेत.
कृपाल सिंग यांचे अवयव फॉरेन्सिक टेस्टसाठी काढण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. लाहोरच्या जिना हॉस्पीटलमध्ये ही टेस्ट करण्यात आली. ५० वर्षीय कृपाल सिंग यांचा पाकच्या तुरुंगात गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. पाकिस्तान अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचा मृत्यू झाला.
अमृतसरच्या वैद्यकीय महाविद्यालयात कृपाल सिंग यांचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. परंतु, त्यांच्या शरीरातील अनेक अवयव गायब असल्यानं हा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र भारतीय डॉक्टरांना समजू शकलेलं नाही. कृपाल सिंग यांच्या शरीरावर किंवा आतल्या भागात कुठल्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.
आता कृपाल सिंग यांचं मृत्रपिंड व आतड्याचे नमुने अधिक तपासणीसाठी अमृतसरबाहेरील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
कृपाल सिंग हे १९९२ साली वाघा बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात गेल्याचं सांगितलं जातं. तिथं त्यांना अटक करण्यात आली. नंतर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवून त्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता. तेव्हापासून लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात असलेल्या कृपाल सिंग यांचा सोमवारी मृत्यू झाला होता.