हिना रब्बानीला दगडाने ठेचून मारा, मौलवींची मागणी

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांच्यातील प्रेमप्रकरण चांगलचं गाजतं आहे.

Updated: Oct 1, 2012, 04:59 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांच्यातील प्रेमप्रकरण चांगलचं गाजतं आहे. गेले काही दिवस ह्या प्रकरणाबद्दल बरीच चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू आहे. मात्र आता हे प्रेमप्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलं आहे.
त्यांच्यातील प्रेमसंबंधाना भारतासह बांगलादेशच्या मुल्ला - मौलवींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बांगलादेशच्या मौलवींनी या दोघांना दगडाने ठेचून मारले पाहिजे असे म्हटले आहे. तर बरेलीच्या मुफ्तिंनी हिना आणि बिलावल हे समाजातून बहिष्कृत करण्याच्या लायकीचे असल्याचे म्हटले आहे.
बांगलादेशचे प्रसिद्ध आणि धर्माचे गाढे अभ्यासक असलेले मुफ्ती फजलुल हक अमिनी म्हणाले, हिना आणि बिलावल यांच्या प्रेमसंबंधाच्या बातम्यांमध्ये सत्यता असेल तर ते इस्लामिक कायद्याला धरुन नाही. जर बिलावलचे दोन महिलांसोबत संबंध असतील आणि तो मद्य सेवन करीत असले तर तो कोणत्याही इस्लामिक राष्ट्राचा प्रमुख होऊ शकत नाही. पाकिस्तानमधील कायदाही या कुकर्माला परवानगी देत नाही. इस्लामिक कायदानुसार अशा लोकांना मरेपर्यंत पर्यंत दगड मारण्याची शिक्षा आहे. जर हिना आणि बिलावल यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्याची सुनावणी इस्लामिक कायद्यानुसार झाली पाहिजे.