www.24taas.com, झी मीडिया, हाँगकाँग
अनाथ म्हणून वाढला... ६६ वर्षांपर्यंत बरंच काही सोसावं लागलं... पण, तरीही तग धरून राहिला. पण, तब्बल ६६ वर्षानंतर मात्र त्याला त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रचंड धक्का सहन करावा लागलाय. कारण, डॉक्टरांनी तो एक पुरुष नसून स्त्री असल्याचा दाखलाच त्याला दिलाय.
होय, आणि हे काही डॉक्टरांकडून चुकीनं घडलेली गोष्ट नव्हे... त्याच्यावर उपचार करणाऱ्या तब्बल सात डॉक्टरांनी अनेक चाचण्यांनंतर त्याला तो ‘स्त्री’ असल्याचं सांगितलंय. ६६ वर्षीय या व्यक्तीचं अचानक पोट फुगल्यानंतर त्यानं डॉक्टरांना गाठलं. त्यावेळ डॉक्टरांना त्याच्या पोटात एक गाठ आढळून आली. त्यानंतर झालेल्या चाचण्यांमध्ये या व्यक्तीची गुणसूत्रे व जनुके वेगळी असल्याचं डॉक्टरांना आढळलं. त्यानंतर ‘टर्नर सिंड्रोम’ हा विकार या व्यक्तीला असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. ‘टर्नर सिंड्रोम’ हा विकार महिला किंवा मुलींना होतो... यामध्ये त्या स्त्रीची गुणसूत्रे बदलतात... त्यामुळे त्यांना गर्भ राहत नाही. `टर्नर सिंड्रोम` हा विकार ३ हजार महिलांत एखादीला असू शकतो.
या व्यक्तीला ‘अँड्रेनल हायप्लासिया’ हाही विकार होता. त्यामुळे त्याच्या शरीरात पुरुषाचे हार्मोन्स वाढले. त्यामुळे ‘तीला’ दाढी व मिशा आल्या. या व्यक्तीच्या गर्भाशयात वाढलेल्या गाठीमुळे ही स्त्री असल्याचे लक्षात आले, असं डॉक्टरांनी लिहून दिलं आहे.
४.५ फूट उंच असणाऱ्या या व्यक्तीची उंची दहाव्या वर्षीच खुंटली होती. हा रुग्ण व्हिएतनाममध्ये जन्मला असून, तो मूळ चिनी आहे. डॉक्टरांनी त्याला स्त्री असल्याचं सांगितल्यावर त्याला प्रचंड धक्का बसला. पण, तो पुन्हा सावरलाय. आता त्याला पुन्हा पुरुष होण्यासाठी शस्त्रक्रिया करायची आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.