आता पाईपलाईनमधून बिअर मिळणार

चक्क पाईपलाईन आहे बिअरची. होय, तुम्ही बरोबर वाचलंय. एका कंपनीनं चक्क बिअरची पाईपलाईन टाकली.

Updated: Sep 16, 2016, 11:51 PM IST
आता पाईपलाईनमधून बिअर मिळणार  title=

लंडन : चक्क पाईपलाईन आहे बिअरची. होय, तुम्ही बरोबर वाचलंय. एका कंपनीनं चक्क बिअरची पाईपलाईन टाकली.

बेल्जियममधल्या ब्रुगेस शहरातली दीडशे वर्षं जुनी आणि जगप्रसिद्ध बिअर कंपनी हाल्व मान. स्थानिक भाषेत अर्धा चंद्र संबोधले जाते. या कंपनीनं फॅक्टरी ते बॉटलिंग प्लांट अशी पाईपलाईनच टाकली. या पाईपलाईनची लांबी तब्बल 3 किलोमीटर आहे. विशेष म्हणजे शहरात कशालाच धक्का न लावता जमिनीखालून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. 

ही पाईपलाईन टाकण्याची गरज पडली कारण या ब्रुगेस शहराचं ऐतिहासिक महत्त्व. हे जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण. युनेस्कोनं जागतिक ठेवा असल्याचा दर्जा दिलेल्या या शहरात अनेक जुन्या आणि देखण्या इमारती आहेत. इथले रस्ते पक्के नाहीत.

फॅक्टरीपासून बॉटलिंग प्लांटपर्यंत बिअर नेली जायची ट्रक्समधून. कोबाच्या रस्त्यावरून 40 टनांचे टँकर्स नेले जायचे. रोज असे चार-पाच ट्रक शहराच्या मध्यभागातून जायचे. त्यामुळे रस्ते खराब झालेत. पर्यटकांना त्रास आणि पर्यावरणालाही. यावर मग कंपनीनं पाईपलाईनचा पर्याय काढला. 

शहराच्या कोणत्याही भागाला धक्का न लावता पाईपलाईन टाकायची असल्याने तब्बल चार वर्ष त्याचं नियोजन सुरू होतं. पण एकदा आराखडा तयार झाल्यावर अवघ्या पाच महिन्यांत काम पूर्ण करण्यात आलं. आणि पाईपलाईन कार्यान्वित झाली. देखण्या शहरावर डाग असलेल्या टँकर ट्रक्सना कायमचा निरोप देण्यात आला. 

या कामाला तब्बल 40 लाख युरो खर्च आला. हा पैसा कंपनीनं कसा उभारला, हे पाहणंही गमतीचं आहे. थोडंफार अनुदान मिळालं असलं तरी 35 लाख युरो लोकांकडून जमा केलेत. गमतीचा भाग असा की याची परतफेड युरोमध्ये नव्हे, तर बिअरमध्ये केली जाणार आहे. 7 हजार 500 युरो देणाऱ्यांना आयुष्यभरासाठी रोज एक ब्रुगेस झॉट बिअरची बाटली दिली जाणार आहे. आता बोला, थ्री चिअर्स फॉर हाल्व मान. हिप हिप हुर्रे...