ब्रिटनमधून सर्वाधिक भारतीय डॉक्टरांना `नारळ भेट`

ब्रिटनमधून सर्वाधिक भारतीय डॉक्टरांना मागील पाच वर्षांत काढून टाकण्यात आले आहे, ही बाब ब्रिटिश मेडिकल कौन्सिलने दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे.

Updated: May 8, 2014, 01:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
ब्रिटनमधून सर्वाधिक भारतीय डॉक्टरांना मागील पाच वर्षांत काढून टाकण्यात आले आहे, ही बाब ब्रिटिश मेडिकल कौन्सिलने दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे.
ब्रिटनमध्ये गेल्या पाच वर्षांत तेथील भारतीय वंशाच्या २५० डॉक्टरांना नोकरी गमवावी लागली. भारतात प्रशिक्षण घेतलेल्या पण ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना ब्रिटनमध्ये नोकरी गमावण्याची शक्यता चार पट अधिक आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या ११७ डॉक्टरांना २००९ पासून ब्रिटनमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली.
भारतापाठोपाठ पाकिस्तान, इजिप्त आणि नायजेरियाच्या डॉक्टरांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. २०१३ मध्ये ब्रिटनने परदेशातून आलेल्या ७५ टक्के डॉक्टरांना गेल्या पाच वर्षांत कमी केले.
ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी परदेशातून आलेल्या डॉक्टरांची जी परीक्षा घेतली जाते ती खूप कठीण आहे आणि परदेशातून तेथे आलेल्या डॉक्टरांकडे ती कौशल्ये नाहीत.
`युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन` या संस्थेने म्हटले आहे की, परदेशी डॉक्टरांचे प्रमाण 1 चतुर्थाश असून त्यातील बहुतांश भारतीय आहेत.
परदेशात शिकलेले किमान ९५ हजार डॉक्टर ब्रिटनमध्ये काम करतात, त्यात बहुतांश भारतीय आहेत.
द ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया ओरिजिन या संस्थेने काही दिवसांपूर्वी परदेशी डॉक्टरांसाठी असलेली परीक्षा घेणाऱ्या जनरल मेडिकल कौन्सिल आणि रॉयल कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स या दोन संस्थांना न्यायालयात खेचले होते आणि या परीक्षेत ब्रिटिश डॉक्टरांच्या तुलनेत परदेशी डॉक्टर १६ पट, तर भारतीय डॉक्टर चार पट अपयशी होतात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
पण हा खटला द ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया ओरिजिन ही संस्था हरली होती. `युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ लंडन` या संस्थेने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय व इंग्लंडच्या वैद्यकीय पदवीधरांच्या कामगिरीत फरक आहे व त्यामुळे आम्ही उत्तीर्ण होण्यासाठी मर्यादा ६३ टक्क्यांएवजी ७६ टक्के गुणांची केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.