सिरीया - जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना आयसीसचा प्रमुख अबू बाकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. सिरीयामध्ये अमेरिकेने केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यामध्ये बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेने अजून याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही पण इराण आणि तुर्कीश वर्तमानपत्राने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे. रविवारी झालेल्या हवाई हल्ल्यात बगदादी ठार झाल्याचं या वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त फौजांनी उत्तर सिरीयामधील रक्का शहराजवळ केलेल्या हवाई हल्ल्यांत बगदादी ठार झाल्याचं वृत्त इराणी सरकारी माध्यमे आणि तुर्कस्तानमधील वृत्तसंस्थांनी इसिसच्या ‘अल अमाक‘ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलंय.
बगदादीला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी अडीच कोटी अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ‘अल अमाक‘ने जाहीर केलेल्या वृत्तानुसार रमझानच्या पाचव्या दिवशी रक्का येथे झालेल्या हवाई हल्ल्यात ‘खलिफा‘ अल-बगदादी मारला गेला आहे. संयुक्त फौजांकडून याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही.
यापूर्वी इराकमधील वृत्तवाहिनी अल सुमारीयाने हवाई हल्ल्यात बगदादी जखमी झाल्याचे वृत्त दिले होते. इसिसच्या विरोधी अमेरिकन फौजांच्या नेतृत्वाखाली विविध देशाच्या फौजांकडून हल्ले करण्यात येत आहे. सिरीया आणि इराकमधील काही शहरांना या फौजांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.