www.24taas.com, इस्लामाबाद
कारगिल युद्धावेळी पाकिस्तानचे तत्कालिन लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांनी भारतात घुसखोरी केली होती, असा गौप्यस्फोट माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केलाय. आयएसआयचे माजी अधिकारी शाहीद अजिज आणि अशफाक हुसेन यांनी मुशर्रफ यांना बेनकाब केलंय. यावेळी केली गेलेली व्युहरचना पूर्णत: परवेज मुशर्रफ यांच्या इशाऱ्यावरूनच चालवण्यात आलं होतं.
भारताविरुद्ध रचलेल्या या कटात मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखालील पाक सैन्य, आयएसआय आणि आणखी काही संघटनाही सामील होत्या. अजिज यांनी कारगिल लढाईत दहशतवादी नव्हे तर पाक सैनिक लढले होते आणि याची माहिती मुशर्रफ आणि नवाज शरीफ या दोघांना होती, असा दावा केला होता. पाकिस्ताननं नेहमीच भारताच्या आरोपांना धुडकावण्याचा प्रयत्न केला आणि कारगिल युद्धात पाक सामिल नव्हतंच अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतू, पाकच्याच एका माजी सैन्य अधिकारी असलेल्या अर्नल अशफाक हुसैन यांनी आपल्या ‘विटनेस टू ब्लंडर’ या पुस्तकात ‘कारगिल युद्धाच्या आधिच परवेज मुशर्रफ यांनी भारत-पाक सीमारेषा पार केली होती. त्यानंतर मुशर्रफ जवळजवळ ११ किलोमीटरपर्यंत आतपर्यंत भारतीय सीमेत घुसले होते. तसंच त्यांनी भारतीय सीमेच्या आतमध्येच एक रात्रदेखील काढली होती’ असा खुलासा केलाय.
हुसैन यांच्या या खुलाशानंतर कारगिल युद्धाबाबत मुशर्रफ यांचा खोडसाळपणा आणि खोटारडेपणा सर्वांसमोर आलाय. पण, खरं बोलतील ते मुशर्रफ कसले, यावेळीही त्यांनी आपल्यावरचे हे आरोप धुडकावून लावलेत.