www.24taas.com, पीटीआय, अबुजा/नैरोबी/नवी दिल्ली
नैरोबी शॉपिंग मॉलला दहशतवाद्यांनी घेरल्यानंतर सुरु झालेली धुमश्चक्री अखेर संपुष्टात आलीय, अशी माहिती केनियाचे राष्ट्रपती उहुरू केन्यात्ता यांनी दिलीय. या दहशतवादी हल्ल्यात तीन भारतीयांसहीत ६७ जण ठार झालेत.
या दहशतवादी हल्ल्याबद्दल राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती केन्याता यांनी टेलिव्हिजनवर ही माहिती दिलीय. पूर्व आफ्रिकेला असणाऱ्या देशाच्या सैनिकांनी या धुमश्चक्रीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं तर ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.
‘हल्लेखोरांवर आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी झालोय. हे कार्य आता पूर्ण झालंय. परंतु या घटनेत आमचीही खूप मोठी हानी झालीय’ असं केन्याता यांनी यावेळी म्हटलंय. उद्यापासून तीन दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. या हल्ल्यात ६१ नागरिकांसह सहा सुरक्षा जवानही मारले गेले आहेत. आपल्याला राष्ट्रीय कुटुंबाच्या रुपात ज्या विध्वंसाला, मृत्यूला आणि दु:खातून जावं लागतंय, त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतोय, असं केन्याता यांनी म्हटलंय.
या घटनेत वेस्टगेट मॉलची इमारत अनेक ठिकाणी ध्वस्त झालीय. या इमारतीतून अनेक शव ताब्यात घेण्यात आलेत. याच वेळेस सापडलेल्या शवांपैकी एक शव भारतीय नागरिकाचं असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या हल्ल्यात मारल्या गेलेल्या भारतीयांची संख्या तीनवर गेलीय.
जखमी झालेल्या भारतीयांमध्ये फ्लेमिंगो ड्युटी फ्री चे कर्मचारी नटराजन रामचंद्रन, नटराजन यांची पत्नी मंजुला श्रीधर, परमशू जैन यांची आई मुक्त जैन आणि १२ वर्षांची पूर्वी जैन यांचा समावेश आहे.
शनिवारी ‘वेस्टगेट मॉल’ला काही दहशतवाद्यांनी आपलं टार्गेट बनवलं होतं. यामध्ये जवळजवळ १७५ हून अधिक जण जखमी झालेत. ६२ जण हॉस्पीटलमध्ये आहेत. अलकायदाशी संबंधित ‘अल शबाब’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी शनिवारी ग्रेनेड फेकून मॉलला घेराव घातला होता. त्यानंतर या संघटनेच्या काही सदस्यांनी ‘सोमालिया’मध्ये या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली तसंच सोमालियामध्ये सैन्य मोहीम राबविल्याबद्दल केनियावर टीकाही केली.
१९९८ नंतर केनियामध्ये झालेला हा सर्वात भयानक हल्ला होता. १९९९८ मध्येही नैरोबीमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर ‘अल कायदा’च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळजवळ २०० जण मारले गेले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.