न्यूयॉर्क : शांततेचं नोबेल पुरस्कार जिंकणारी मलाला युसूफझई ही संयुक्त राष्ट्रांची सर्वात कमी वयाची शांतता दूत ठरलीये. न्यूयॉर्कमधल्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोलियो गुटर्स यांनी 19 वर्षांच्या मलाला हिला शांतता दूत म्हणून नियुक्त केलंय.
मलाला विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी काम करणार आहे. मुळची पाकिस्तानी असलेल्या मलाला हिला शाळेत जाण्याबद्दल मोठी शिक्षा भोगावी लागलीये. तिला शाळेतून परत येताना स्कूल व्हॅनमध्येच गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यातून बचावलेली मलाला ही पाकिस्तानमध्ये मुलींवर होत असलेले अत्याचार, त्यांना नाकारला जात असलेला शिक्षणाचा हक्क याबाबत सातत्यानं आवाज उठवतेय.