नेल्सन मंडेला पुन्हा हॉस्पीटलमध्ये

वर्णभेदाविरुद्धच्या मोहिमेचे प्रणेते तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना शुक्रवारी रात्री उशीरा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 8, 2013, 06:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग
वर्णभेदाविरुद्धच्या मोहिमेचे प्रणेते तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना शुक्रवारी रात्री उशीरा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलाय. राष्ट्रपती जॅकब जुमा यांच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या माहितीमध्ये माजी राष्ट्रपती नेल्सन मंडला यांच्या फुस्फुसांत गेल्या काही दिवसांपासून संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलंय. शुक्रवारी रात्री जवळजवळ दीडच्या सुमारास त्यांची तब्येत आणखीनच बिघडली. त्यांना तात्काळ प्रिटोरिया हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. राष्ट्रपती कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मंडेला यांची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे.
नोबल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या ९६ वर्षीय मंडेला यांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक वेळा प्रकृती बिघडल्यानं हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागलंय. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चाललीय. मंडेला यांच्यावर सध्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

मंडेला रोबेन बेटावर कैदी म्हणून बंदीस्त असल्यापासून त्यांना फुस्फुसाचा आजार आहे. मंडेला यांना कारावासात क्षयरोगालाही सामोरं जावं लागलंय. मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले अश्वेत राष्ट्रपती आहेत. त्यांनी १९९४ ते १९९९ पर्यंत देशाचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं. वर्णभेदाविरुद्ध तसंच लोकशाहीसाठी संघर्ष करणाऱ्यांचं नेतृत्व केल्यानं त्यांना राष्ट्रपिता म्हणून सन्मानित करण्यात आलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.