पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी!

पाकिस्तानच्या एका न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार, संपूर्ण पाकिस्तानात भारतीय सिनेमांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 19, 2013, 05:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लाहौर
पाकिस्तानच्या एका न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार, संपूर्ण पाकिस्तानात भारतीय सिनेमांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आलीय.
बहूचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या टीव्ही टॉक शोचा प्रस्तुतकर्ता मुबसीर लुकमान यांनी भारतीय सिनेमांविरुद्ध याचिका दाखल केली होती. लुकमान हे माजी सिनेमा निर्माते आणि भारत विरोधी म्हणून ओळखले जातात. लाहौर कोर्टाचे न्यायाधीश खालिद महमूद यांनी या याचिकेवर अंतरिम आदेश जाहीर केलाय.
लुकमान यांनी केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानी नियमांतर्गत संपूर्णत: भारतात चित्रीत झालेला आणि कोणत्याही भारतीयाद्वारे प्रायोजित केलेल्या सिनेमा पाकिस्तानात दाखवला जाऊ शकत नाही. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, पाकिस्तानात भारतीय सिनेमे दाखवण्यासाठी प्रयोजकांची ओळख लपवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला जातो. त्यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी एक न्यायालयाचा आदेशही सादर केला.
न्यायालयानं या याचिकेचा विचार करत ‘सिनेमा सेन्सॉर बोर्ड ऑफ रिव्हेन्यू’लाही पुढच्या सुनावणीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.