इस्लामाबाद : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांनी भारताला पुन्हा एकदा अणू हल्ल्याची धमकी दिली आहे. आमची अणू अस्त्र शोभेच्या वस्तू नाहीत, अशी गरळ आसीफ यांनी ओकली आहे.
आसीफ यांनी पाकिस्तानातल्या डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक विधानं केली आहेत. उरीमधला हल्ला हा भारतानं स्वतःच घडवून आणल्याचंही आसीफ यांनी उलटा आरोप केला आहे.
आमचे अस्तित्वच धोक्यात आले तर आम्ही त्यांना नेस्तनाबूत करू, असे वक्तव्य त्यांनी केले. ही मुलाखत दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे. आसिफ यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही १७ सप्टेंबर रोजी जिओ या पाकिस्तानच्या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळीही त्यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती.