मॅक्रॉन फ्रान्सचे नवे आणि सर्वात तरूण राष्ट्राध्यक्ष

जगात प्रखर राष्ट्रवादाचं वादळ वाहत असताना, फ्रेंच जनतेनं मात्र आपल्या मूळ स्वभावाला धरून आपला नेता निवडलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 8, 2017, 02:25 PM IST
मॅक्रॉन फ्रान्सचे नवे आणि सर्वात तरूण राष्ट्राध्यक्ष title=

पॅरिस : जगात प्रखर राष्ट्रवादाचं वादळ वाहत असताना, फ्रेंच जनतेनं मात्र आपल्या मूळ स्वभावाला धरून आपला नेता निवडलाय. मध्यममार्गी विचार सरणीचे इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेत. प्रखर राष्ट्रवादी उमेदवार मेरिन ला पेन यांच्यावर मॅक्रॉन यांनी दणदणीत विजय मिळवलाय.

पुढच्या महिन्यात ते चाळीशीत प्रवेश करताय...ते उत्तम पियानो वाजवता...फ्रान्सच्या उदारमतवादी पिढीचे ते खरेखुरे पाईक आहेत...आणि पुढच्या वीकेंडला ते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा भार खांद्यावर घेणार आहेत...

हे आहे इम्यानुल मॅक्रॉन... फ्रँच राज्यक्रांतीनंतरच्या काळातले सर्वात तरूण नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष...युरोपियन युनिय़नचे खंदे समर्थक मॅकॉन यांनी त्यांच्या क़डव्या प्रतिस्पर्धी मॅरिन ला पेन यांच्यावर दणदणीत पराभव केलाय. रविवारी झालेल्या मतदानात मॅक्रॉन यांना 65.1 टक्के मतं मिळाली आहेत. तर मॅरिन ला पेन यांना अवघी 34.2 टक्के मतं मिळालीत. याआधीच्या मतदानाच्या टप्प्यात मॅक्रॉनच आघाडीवर होते. पण त्यांची आघाडी इतकी मजबूत नव्हती. फ्रेंच मतदारांनी कट्टर उजव्या विचारांच्या ला पेन यांना नाकारून मध्मम विचारांच्या मॅक्रॉन यांना राष्ट्रध्यक्षपदी काम करण्याची संधी दिलीय.. 

मॅक्रॉन यांची राजकीय कारकीर्द जबरदस्त आहे. मॅक्रोन दोन वर्षांपूर्वी विद्यमान राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यांनी मंत्रीपद सोडलं, आणि स्वतःचा एन मार्च नावाचा पक्ष काढाला. 

यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या लढाईतल्या चार उमेदवारांपैकी मॅक्रॉन सर्वात तरूण उमेदवार होते. त्यांच्या राजकाराणाचा आणि एकूणच वैयक्तित जीवनाचा बाज फ्रान्सच्या जनतेत रुजलेल्या उदारमतवादाचं समर्थन करणारा आहे.त्यामुळेच त्यांना विद्यमान राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांचे वारस म्हणून संबोधलं जातं..

मॅक्रॉन यांनी आपल्या प्रचारादरम्यान युरोपियन युनियन आणखी मजबूत करण्याचं आश्वासन फ्रेंच जनतेला केलाय.  ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत उतरलाय.. इकडे, फ्रान्समध्ये युरोपियन युनियनचं समर्थन करणारं सरकार येणं हे युनियनच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं होतं. म्हणूनच फ्रान्सच्या जनतेनं इमॅन्युअल मॅक्रोन यांच्या बाजूनं कौल दिल्यानं ब्रसेल्समध्ये यामुळे युरोपियन युनियनच्या पदाधिका-यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. 

जगभरात राष्ट्रवादचा पुरस्कार करणाऱ्याच्या विचाराची सरकारांना जनतेचा कौल मिळतोय..ट्रम्प, पुतीन, अर्डेगन हे नेते सध्या जगाच्या राजकारणात आपल्या प्रखर राष्ट्रावदाचा डंका वाजवत फिरतायत...फ्रान्सच्या जनतेसमोरही यंदाच्या निवडणूकीत असाच प्रखर राष्ट्रवादाची भलावण करणाऱ्या मेरिन ला पेन यांचा पर्याय होता.

पण उदारमतवादाची गंगोत्री् म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फ्रंच जनतेनं आपल्या मूळ स्वभावाला धरून मतदान केलंय. या पुढच्या काळात इमॅन्युअल मॅक्रॉन यांना चारही बाजूनं येणाऱ्या राष्ट्रवादाच्या झळा सोसत आपला अजेंडा राबवण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे.