काबूल : अफगाणिस्तानामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. हेलमंड भागातील न्यू काबूल बँकेवर फिदायीन दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात 10 जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
दहशतवाद्यांनी अनेक जणांना ओलिस ठेवल्याचं समजतंय. गेल्या तीन दिवसांतील हा लागोपाठ तिसरा दहशतवादी हल्ला आहे. आधी ऑस्ट्रेलियातलं सिडनी, मग पाकिस्तानातलं पेशावर आणि आता अफगाणिस्तानातलं हेलमंड शहर दहशतवाद्यांचं टार्गेट ठरलंय.
पेशावरच्या हल्ल्यानं हादरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संपूर्ण प्रदेशातून तालिबानला संपवण्याचा इरादा जाहीर केलाय. अफगाणिस्तानसोबत संयुक्त मोहीम उघडून तालिबानचा खातमा करू, असं त्यांनी जाहीर केलंय.
अतिरेक्यांसोबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असंही ते म्हणालेत. पेशावरमधील शाळेवर तालिबान्यांच्या हल्ल्याचा शांतीचा नोबेल पुरस्कार मिळवणा-या मलाला युसूफझईने तीव्र शब्दात निषेध नोंदवत, दहशतावाविरूद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
पाकिस्तानमधील शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर भारताताही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व राज्यांना सतर्क राहण्याची सूचना गृहमंत्रालयाने केली आहे. सर्व शाळा, कॉलेजेस तसंच महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिली आहे.
जानेवारीच्या अखेरपर्यंत हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानातील पेशावर येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात 132 विद्यार्थ्यांसह 141 जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. पेशावरमध्ये बळी गेलेल्या विद्यार्थ्यांना आज संसदेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये २ मिनिटांची स्तब्धता पाळून या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या नातलगांप्रती संसदेनं सहवेदना व्यक्त केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.