www.24taas.com, झी मीडिया, लंडन
`श्रीकृष्ण वडा पाव`... लंडनमधलं एक हॉटेल... एका मराठी माणसानं सुरू केलेलं हे हॉटेल म्हणजे परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी जिभेचे चोचले पुरवण्याचं क ठिकाण... मुंबईची आणि ओघानंच वडा-पावची आठवण आली की हीच लोक इथं नक्की गर्दी करतात.
सुबोध जोशी आणि सुजय सोहनी यांनी १५ ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे हॉटेल सुरू केलं. २०१० मध्ये एक छोटसं स्नॅक्स बार त्यांनी सुरु केलं होतं. पण अल्पावधीतच भारतीय खवय्यांनी या स्नॅक्स बारला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. भारतीयांचा मिळालेल्या ह्या पाठिंब्याचा जोरावर त्यांनी रेस्टॉरंटदेखील उभारलं आणि आता तर लंडनमधील हॅरो शहरातही दुसरं रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
या हॉटेलचं आणखी एक विशेष म्हणजे इथं काम करणारी टीमही मराठमोळीच आहे. त्यामुळे मराठमोळा तडकाही वडा-पावला आपोआपच मिळतो. या रेस्टॉरंटमध्ये फक्त एक पाऊंडमध्ये तुम्हाला वडा-पावचा आस्वाद घेता येतो. पण फक्त वडा पावच नव्हे तर बटर वडा पाव, शेजवान वडा पाव अशा वेगवेगळ्या पद्धतीतही वडा-पाव उपलब्ध आहे. वडा-पावसोबतच अनेक भारतीय पदार्थ येथे तुम्हाला मिळू शकतात. परदेशी पदार्थ मात्र इथं मिळणार नाहीत.
वडा-पावसोबत पुरणपोळीसारखा मराठमोळा पदार्थही तुम्हाला इथे मिळेल. तसंच पंजाबी, साऊथ इंडियन, गुजराती असे पदार्थ तर भारताची ओळख मग ते कसे नाही मिळणार... खास चाट म्हणजे झणझणीत तिखट अशी पाणीपुरी देखील मिळणार आहे. आपल्या वेगळेपणामुळे थोड्या कालावधीतच या हॉटेलनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.