www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर
जगातील सर्वाधिक वयोवृद्ध पुरुष अशी अधिकृतपणे मान्यता मिळालेले अतरुरु लिकाटा यांचं नुकतचं निधन झालं, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्ने हे जाहीर केलं आहे. लिकाटा हे इटलीत रहात होते. आणखी आठच दिवसांनी लिकाटा यांचा ११२ वा वाढदिवस साजरा व्हायचा होता.
यंदाच्या २८ फेब्रुवारी रोजी १११ वर्षे ३0२ दिवसांचे लिकाटा जगातील सर्वाधिक वयाचे पुरुष असल्याची नोंद गिनीज बुकात केली गेली होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्चे मुख्य संपादक क्रेग ग्लेंडे यांनी लिकाटा यांच्या निधनाची माहिती जाहीर करताना म्हटले की, अमेरिकेत राईट बंधूंनी पहिल्या विमानाचे यशस्वी उड्डाण करण्यापूर्वी जन्मलेल्या आणि १११ वर्षांहून अधिक आयुष्य लाभलेल्या फक्त 4 पुरुषांपैकी एक असलेल्या सिग्नॉर लिकाटा यांच्या निधनाच्या बातमीने खूप दु:ख झाले.
अतरुरु लिकाटा १११ वर्षे ३५७ दिवसांचे असताना २४ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुले, आठ नातवंडे आणि चार पणतवंडे आहेत. लिकाटा ७८ वर्षांचे असताना १९८0 मध्ये त्यांची पत्नी रोसा हिचे निधन झाले होते.
दक्षिण इटालीतील एन्ना शहरात लिकाटा यांचा २ मे 1902 रोजी जन्म झाला होता. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी खाणकामगार म्हणून मजुरी करायला सुरुवात केली आणि वयाच्या १९ व्या वर्षी ते इटलीच्या लष्करात दाखल झाले. १९३९ मध्ये लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर लिकाटा यांनी यशस्वी व्यापार केला.
लिकाटा यांच्या आधी पश्चिम न्यूयॉर्कमधील सालुस्तिआनो सांचेझ-ब्लाझक्वेझ यांची ११२ वर्षांचे जगातील सर्वाधिक वयोवृद्ध पुरुष म्हणून गिनीज बुकात नोंद झाली होती. त्यांचे गेल्या सप्टेंबरमध्ये ग्रँड आयलंडवर निधन झाल्यानंतर लिकाटा जगातील सर्वात वयोवृद्ध पुरुष ठरले होते. त्याआधी हा विक्रम जपानच्या जिरोमॉन किमुरा यांच्या नावे होता. किमुरा यांचे गेल्या १२ जूनला वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाल्याचं गिनिज बुकने म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.