www.24taas.com, झी मीडिया, हरारे
झिम्बाब्वेत बुधवारी झालेल्या मतदानानंतर अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या झानु-पीएफ या पक्षाने विजयाचा दावा करत तशी घोषणाच केली. या घोषणेनंतर हरारे येथील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. पक्षांची कार्यालये आणि अन्य ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वे या देशात अत्यंत शांततेने मतदान झाले. मात्र, विरोधी पक्ष असणाऱ्या मॉर्गन त्सावनगिरी यांच्या मूव्हमेंट फॉर डेमॉक्रॅटिक चेंज एमडीसी या पक्षाने मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे.
झिम्बाब्वेत निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षात दावेप्रतिदावे करण्यात येत आहेत. २००८च्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या झानु-पीएफ या पक्षाने विजयाचा दावा केल्याने तणाव वाढला आहे.
झिम्बाब्वेत निकाल प्रक्रिया पूर्ण होण्याआधी कोणतीही घोषणा करणे अवैध आहे. निकाल जाहीर होण्याआधी दावे करणारांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. मुगाबे यांच्या झानु-पीएफ या पक्षातील वरिष्ठ सूत्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत आमचा पक्ष विजयी झाला असल्याचा दावा झानु-पीएफ या पक्षाच्या नेत्यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.