www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या इलिनॉयस प्रांतातील हॉर्वे सिटी काऊंसिलने २००२ साली भारतात झालेल्या गोध्रा हत्याकांडाची निंदा करणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. गोध्रा येथील दंग्यातील पीडितांना अद्याप न्याय न मिळाल्याबद्दल या प्रस्तावात चिंता व्यक्त केली आहे.
सिटी काऊंसिलने या आठवड्यात मंजूर केलेल्या प्रस्तावात २७ फेब्रुवारी २००२ ला झालेल्या गोध्रा हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्या तसंच या हल्ल्याची झळ पोहोचलेल्या पीडितांचं सांत्वन केलं आहे. या प्रस्तावात असं म्हटलं आहे, ‘ हॉर्वे सिटी काऊंसिल २००२ च्या गुजरातमधील दंग्यांची निंदा करत आहे. कारण यात मानवाधिकारांचं हिन पद्धतीने उल्लंघन झालेलं आहे आणि गुजरातमध्ये कायदा-सुव्यवस्था स्थापन करण्याची जबाबदारी असणाऱ्या व्यवस्थेचं अपयश आहे.’
जगभरातून निषेध होऊनही अद्याप गोध्रा हत्याकांडातील पीडितांना न्याय मिळालेला नाही. या संदर्भात अनेक अटक सत्रं घडली. पण, मोठ्या प्रमाणावर दंगल घडवूनही फार कमी जणांना अटक करण्यात आलं असल्याचं यात म्हटलं आहे.