www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानात पश्चिम भागातल्या पेशावरमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेल्या एका मंदिरात काही अज्ञात लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना घडलीय. पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल १६० वर्षांनी या मंदिराचे दरवाजे मागच्या वर्षी उघडण्यात आले होते.
हिंदू समाजाच्या काही नेत्यांनी म्हणण्यानुसार, काही अज्ञात इसमांनी या गोरखनाथ मंदिरातील देव-देवतांचे फोटो जाळले तसंच तिथं असलेलं ऐतिहासिक शिवलिंगही उद्ध्वस्त करण्यात आलंय. गोर गाथरी भागातील या मंदिरातून हल्लेखोरांनी मूर्तीही पळवल्याचं त्यांनी म्हटलंय .
मंदिराच्या संरक्षकाच्या म्हणण्यानुसार, मागच्या दोन महिन्यांत या मंदिरावर झालेला हा तीसरा हल्ला होता. घटनेच्या चौकशीसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. विविध न्यूज चॅनेल्सच्या फुटेजमधून या मंदिरात झालेली तोडफोड आणि जाळपोळ दिसून येत होती.