www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानातील एका टीव्ही चॅनलने एका हिंदू मुलाचं इस्लाममध्ये धर्मांतर केलं जात असल्याच्या घटनेचं लाइव्ह प्रसारण केलं. या घटनेवर ‘डॉन’ या प्रसिद्ध पाकिस्तानी वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे, की या वरून स्पष्ट होतं की पाकिस्तानात अन्य धर्मांना इस्लामइतका मान दिला जात नाही. तसंच, देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया मसालेदार बातम्यांसाठी कुठल्याही पातळीवर जाऊ शकते.
वृत्तपत्रात दिलं आहे, “मीडिया उद्योग आर्थिक फायद्यासाठी नीतिमत्ता बाजूला ठेवून सामान्य माणसांची खिल्ली उडवू लागलं आहे. याचंच एक उदाहरण मंगळवारी टीव्हीवर पाहायला मिळालं. एका टीव्ही शोमध्ये एका इमामाद्वारे हिंदू मुलाचं धर्मांतर होत असताना थेट प्रसारीत केलं गेलं. हा धर्मांतराचा सोहळा टीव्ही शो मधलाच एक भाग होता. तो स्टुडिओतच लोकांसमोर दाखवण्यात आला. एवढंच नव्हे, तर मुलासाठी नवं मुस्लिम नाव काय असावं यासाठी उपस्थित प्रेक्षकांचाच कौल घएण्यात आला.”
डॉनमध्ये पुठे लिहिलं आहे, “त्या मुलाचं धर्मांतर त्याच्या मर्जीविरुद्ध केलं का, हा वेगळा मुद्दा आहे. पण मुळात प्रेक्षकांना काही नवीन आणि चमचमीत द्यावं, यासाठी एखाद्याच्या धार्मिक आणि वैयक्तिक गोष्टींना असं सार्वजनिक रूप देणं चुकीचं आहे.”