www.24taas.com, मुंबई
२६/११ च्या दोन दिवस अगोदर अबू जिंदालनं फैयाज कागझीसोबत पाकिस्तानात हल्ल्याचं मॉकड्रील केल्याची माहिती आता समोर येतेय. पाकिस्तानच्या बैतुल्ला मुजाहिद्दीन भागात दहशतवाद्यांनी तब्बल दोन तास ही मॉकड्रील घेतली होती. यासाठी सर्व सोयीयुक्त असा कंट्रोल रुमही बनवण्यात आला होता.
इंटरपोलला हवा असलेला आणि २६/११ चा कट रचणारा बीडचा फैयाज कागझी हा अबू जिंदालचा साथीदार आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिर्झा हिमायत बेगला कागझीनं प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. कोलंबोत तीन आठवडे कागझीनं हे प्रशिक्षण दिल्याचं एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कागझी हा औरंगाबादच्या २००६ च्या शस्त्रसाठा प्रकरणात पोलिसांना हवा आहे. कोलंबोतल्या या प्रशिक्षणावेळी कागझी, बेग आणि आणखी एक व्यक्ती हजर होती. कागझीनं बेगला अडीच लाख रुपये देऊन ओळख बदलून महाराष्ट्रात सिमीचं जाळं वाढवण्याच्या सूचना केल्याचं उघड झालंय. बेग त्यानंतर ठिकाणं बदलतं राहिला. बेगला पुण्यात सप्टेंबर २०१० मध्ये अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेनं अबू आणि फरार असलेल्या कागझी विरोधात एफआयआर दाखल केलाय. काझगीवर २६/११ च्या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पाकिस्तानमध्ये दोन दिवस मॉकड्रील केल्याचं अबू हमजाच्या खुलाशात उघड झालंय. क्रुरकर्मा कागझीचं छायाचित्र पहिल्यांदा ‘झी 24 तास’नं प्रसिद्ध केलंय.
.