नवी दिल्ली: बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पीके चित्रपटाचं पोस्टर अश्लील नाही, असा निर्वाळा देत दिल्लीतील कोर्टानं आमिर खानविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे.
काही दिवसांपूर्वी आमिर खानचं निर्वस्त्र छायाचित्र असलेलं 'पीके' चित्रपटाचं पोस्टर झळकलं होतं. या पोस्टरवर देशभरात गदारोळ निर्माण झाला होता.
याप्रकरणी आमिर खान, पीके चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते राज कुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा, सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतील मेट्रोपोलिटन कोर्टात दाखल करण्यात आली होती. या अश्लील छायाचित्रामुळं समाजावर विपरीत परिणाम होईल आणि लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होईल असं याचिकाकर्ते वकिल रंजन खतूमारिया यांचं म्हणणं होतं.
मंगळवारी न्या. पवनसिंह रजावत यांनी ही याचिका फेटाळून लावलीय. पीकेच्या पोस्टरमुळं लैंगिक भावनांना उत्तेजन मिळत नसल्याचं स्पष्ट करत याचिकाकर्त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठीच हा खटाटोप केल्याचं न्यायालयानं म्हटलंय.
केवळ नग्नतेच्या आधारे कोणतंही छायाचित्र अश्लील ठरु शकत नाही. जसं पूर्ण कपडे घातलेल्या व्यक्तीचं छायाचित्रही अश्लील वाटू शकतं. त्याचप्रमाणं निर्वस्त्र व्यक्तीचं छायाचित्रही अश्लील होऊ शकत नाही, असं मतही कोर्टानं मांडलं. त्यामुळं या पोस्टरविरोधात एफआयआर दाखल करण्यात कोणताही आधार नसल्याचं सांगत कोर्टानं याचिका फेटाळून लावली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.