अहमदनगर: सिने-चित्रपटसृष्टीचे चतुरस्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
मंगळवारी सकाळी ९.३०च्या सुमारास सदाशिव अमरापूरकर यांचं पार्थिव मुंबईहून नगर इथं त्यांच्या घरी माणिक चौकातील अमरापूरकर वाड्यात आणण्यात आलं. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची सकाळपासूनच रांग लागली होती. खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासह हजारो नागरिकांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
अंत्ययात्रेला सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदाताई, कन्या साईली जहागीरदार, केतकी जातेगावकर, रिमा गद्रे तसंच जावई शेफ जातेगावकर, डॉ. बाळकृष्ण जहागीरदार, पुणे इथले व्यावसायिक अमित गद्रे, भाऊ नीळकंठ आणि राजाभाऊ अमरापूकर, अलका अमरापूरकर, चेतन अमरापूरकर, प्रशांत अमरापूरकर उपस्थित होते. कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, नेता सुभाष चौक, दिल्लीगेटमार्गे अंत्ययात्रा अमरधाम इथं नेण्यात आली. त्यानंतर लाडक्या अभिनेत्याला नगरकरांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी ‘कै.अमरापूरकर अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. नाट्य परिषदेचे नगर शाखेनं अंत्ययात्रेचं नियोजन केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.