विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारला भाजपकडून खासदारकीचं तिकीट?

भाजपचे खासदार विनोद खन्ना यांचं निधन झाल्यानंतर आता तेथे पोटनिवडणूक होणार आहे. 

Updated: May 7, 2017, 11:20 AM IST
विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारला भाजपकडून खासदारकीचं तिकीट? title=

चंदीगड : गुरदासपूर-पठाणकोट लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार विनोद खन्ना यांचं निधन झाल्यानंतर आता तेथे पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून यासाठी अभिनेता अक्षय कुमारला उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जातंय. विनोद खन्ना यांच्या दुसऱ्या पत्नी कविता यांचे नाव देखील उमेदवारीसाठी चर्चेत आहे. २७ एप्रिलला विनोद खन्ना यांचे निधन झाले होते.

अभिनेते अक्षय कुमारला नुकताच रुस्तम चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच सामाजिक भान असलेला अभिनेता म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शहीद जवानांच्या मदतीसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराची सुद्धा चर्चा आहे. भाजपशी वाढत्या जवळीकतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष त्याला खासदारकीचे तिकीट देणार अशी चर्चा आहे.

गुरदासपूर-पठाणकोट मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी तेथील स्थानिक नेते सुद्धा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जर बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर विरोध देखील होऊ शकतो. 

उद्योजक स्वर्णसिंह सलारिया, माजी आमदार अश्विनी शर्मा, जगदीश साहानी आणि अविनाश राय खन्ना यांचेही नाव चर्चेत आहे.