त्रिशूर, केरळ : बाहुबली-२ ची उत्सुकता आता दिवसागणीक वाढतेच आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा देशापुढील एक महत्त्वाचा प्रश्न असतानाच बाहुबलीच्या दुसऱ्या भागाचं शूटींग सुरू झालं खरं; पण आता यात एक हत्ती आडवा आलाय.
त्याचं झालं असं की केरळमधील त्रिशूरमध्ये चित्रपटाच्या शूटींगमध्ये एक हत्ती वापरला गेला. पण, काही प्राणीमित्र संघटनांच्या मते हा हत्ती वापरण्यासाठी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अथवा दिग्दर्शकांनी भारतीय पशू कल्याण मंडळाची परवानगी घेतली नसल्याचा आरोप या मंडळींनी केला आहे. त्यामुळे २००१ सालच्या 'अॅनिमल रजिस्ट्रेशन अॅक्ट' चे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून उल्लंघन झाल्याचा आरोप या प्राणीमित्र संघटनांनी केला आहे.
काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली होती. त्यात 'चिरकाल कालीदासन' हा हत्ती वापरण्यात आला होता.
या प्राणीमित्र संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कॅमेरामन आणि हत्तीचा माहूत यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
चित्रीकरणादरम्यान चार तास या हत्तीला हाय व्होल्टेज लाईट्सच्या प्रकाशात उभे केले गेले होते. तसेच या हत्तीचा माहूत अंकूश वापरत होता ज्यावर कायदेशीर बंदी आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून यावर काही प्रतिक्रीया अद्याप तरी आलेली नाही.
आता सर्व कारणांमुळे कटप्पाने बाहुबलीला का मारले हे समजण्यास जास्त वेळ लागू नये, अशीच बाहुबलीच्या चाहत्यांची इच्छा असणार आहे हे नक्की.