फिल्म रिव्ह्यू: अवधूतचा फसलेला 'एक तारा'!

आज मराठीतले एक तारा आणि चंद्रकोर हे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत. याच बरोबर आयुष्यमान खुराना स्टारर हवाईजादा, महेश भट्ट यांचा खामोशियां आणि के के मेनन, तिस्का चोप्रा यांची भुमिका असलेला रहस्य असे ३ बॉलिवूडपटही या विकेंडला आपल्या भेटीला आलेत.

Updated: Jan 30, 2015, 08:52 PM IST
फिल्म रिव्ह्यू: अवधूतचा फसलेला 'एक तारा'! title=

मुंबई: आज मराठीतले एक तारा आणि चंद्रकोर हे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत. याच बरोबर आयुष्यमान खुराना स्टारर हवाईजादा, महेश भट्ट यांचा खामोशियां आणि के के मेनन, तिस्का चोप्रा यांची भुमिका असलेला रहस्य असे ३ बॉलिवूडपटही या विकेंडला आपल्या भेटीला आलेत.

रईस लशकरीया निर्मित, अवधूत गुप्ते दिगदर्शित आणि संतोष जुवेकर स्टारर 'एक तारा' हा सिनेमा या आठवड्यात बिग स्क्रिनवर दाखल झालाय.

कथा

एक तारा या सिनेमाची कथा आहे एका वारकरी पंथातीला एका गायकाची. या सिनेमातला नायक संतोष जुवेकर एका छोट्याशा गावातला एक तरुण, ज्याला अभंग गाण्याची प्रचंड आवड असते. हा तरुण आपल्या गावातल्या लोकांच्या मदतीनं एका रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतो. एवढंच नाही तर तो हा शो जिंकून भरपूर प्रसिद्धीही मिळवतो आणि हीच प्रसिद्धी नंतर त्याच्या डोक्यात जाते. त्याची ही म्युजिकल जर्नी, त्याचा हा प्रवास, या प्रवासातला त्याच्यातला बद्दलच्या सगळ्या गोष्टी सिनेमात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. 

अभिनय 

अभिनेता संतोष जुवेकरनं साकारलेल्या माउली या व्यक्तिरेखेचे दोन पैलू आहेत. एकिकडे एक खूप साधा सोज्वळ संतोष जुवेकर पहायला मिळतो. तर दुसरीकडे त्याच्या नेहमीच्या बिनधास्त इमेजमध्ये दिसणारा संतोष दिसतो. माउली ही भूमिका त्याच्यासाठी एक ईमेज ब्रेकर आहे हे तर खरं, पण माउली साकारणारा संतोष प्रेक्षकांना किती पचेल याची मात्र शंका वाटते. माउली या रोलमध्ये फिट होण्याचा त्यानं भरपूर प्रयत्न केलाय. मात्र काही ठिकाणी त्याचा प्रयत्न फसलाय. संतोष जुवेकरनं सिनेमात चांगला अभिनय केलाय यात काहीच शंका नाही.. INFACT त्यानं साकारलेला रॉकस्टार, त्यातल्या नेगेटिव्ह रोलमध्ये तो खूपच प्रभावी वाटतो.

तेजस्विनी पंडीत

तेजस्विनीनं साकारलेली भूमिका आजच्या काळातली स्पर्धात्मक युगातली एका स्मार्ट तरुणीची आहे. नेहमीपेक्षा काहीतरी हटके तिच्या वाट्याला आलंय. सिनेमातला तिचा कॉस्च्युम, तिची बॉडी लँग्वेज, तिनं ज्या प्रकारे संपूर्ण चित्रपटात स्वत:ला कॅरी केलंय, तिनं तिच्या भूमिकेला नक्कीच न्याय दिलाय. 

उर्मिला निंबाळकर या नवोदित अभिनेत्रीनंही आपला बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. तिची झलक पाहिल्यावर कुठेतरी मुक्ता बर्वेची आठवण होते. संतोष जुवेकर प्रमाणेच उर्मिलाच्याही भूमिकेत एक ट्रान्सफॉर्मेशन दिसून येतं.

दिग्दर्शन 

दिग्दर्शक अवधूत गुप्तेसाठी 'एक तारा' हा सिनेमा एक वेगळाच प्रयत्न आहे. एक अशी कथा ज्यात भूमिकांना ना स्कोप आहे, संगीताला स्कोप आहे, अनेक ट्विट्स आणि टर्न्स आहेत. अवधूतनं या सिनेमाच्या माध्यमातून एका गायकाच्या आयुष्यावर फोकस करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचं यश आणि अपयश दाखवण्याचा प्रयत्न केलाय. 'एक तारा' सिनेमाला एक उत्तम  ट्रिटमेंट देण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. पण कुठेतरी सिनेमाची कथा भरकटली जाते. एका अत्यंत चांगल्या फ्लोमधून सिनेमा जात असताना, कुठल्यातरी वेगळ्याच ट्रॅकवर, सिनेमा जाउन पोहाचतो. अमोल गुप्तेची एंट्री, अंडरवर्ल्डचा तो सीन आणि  माउली अर्थातच त्यानंतरचा संतोष जुवेकर हा उगाचाच कनेक्ट केल्यासारखा वाटतो.  

संगीत

अवधूत गुप्ते यानंच सिनेमाला संगीत दिलंय. सिनेमात जवळ जवळ १३ गाणी आहेत. एक म्युजिकल सिनेमा असल्यामुळे कुठेतरी ही सिनेमाची गरज नक्कीच वाटते. 'जयजय राम कृष्ण हरी' या अभंगाचं एक वेगळं आणि सुरेल वर्जेन यात ऐकायला मिळतं. तर दुसरीकडे 'जिंदगी है झाड' हे गाणंही सध्या भरपूर प्रसिद्धी मिळवतंय. गाणी जरी छान आणि सुरेल असली तरी त्या-त्या ठिकाणी त्या गाण्यांची खरंच गरज आहे का? याचाही विचार खरंतर दिग्दर्शकानं करायला हवा होता.

अवधूत गुप्ते दिग्दर्शित एक तारा या सिनेमाची कथा खूपच सुंदर आहे. पण सिनेमाची मांडणी फसलीये. संतोष जुवेकरची व्यक्तिरेखा अनेक ठिकाणी  कन्फ्युजिंग जाणवते. कधी तो चांगला तर कधी वाईट, कधी एकदम sofisticated तर कधी पुन्हा गावतल्या शैलीत बोलणारा. त्याच्या भूमिकेला संपूर्ण चित्रपटात हवी तशी ट्रीटमेंट देता आली नाहीये. या संपूर्ण प्रोसेसमध्ये सिनेमाचा ग्राफ कायम वर-खाली होताना दिसतो.

सिनेमातील गाणी आणि कलाकारांचे परफॉर्मेन्स पाहता या सिनेमाला २.५ स्टार्स.

जयंती वाघधरे 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.