अभिनेते अनुपम खेर यांच्याविषयी जाणून घ्या या ११ गोष्टी

मुंबई : ७ मार्च २०१६ ला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आपला ६१वा वाढदिवस साजरा करताहेत.

Updated: Mar 7, 2016, 04:25 PM IST
अभिनेते अनुपम खेर यांच्याविषयी जाणून घ्या या ११ गोष्टी  title=

मुंबई : ७ मार्च २०१६ ला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आपला ६१वा वाढदिवस साजरा करताहेत. सलग तीन दशके बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने साम्राज्य गाजवणाऱ्यांच्या यादीत अनुपम खेर यांचा समावेश होतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी या खास ११ गोष्टी जाणून घ्या. 

१. अनुपम खेर कोणत्याही प्रकारची भूमिका सहज करू शकतात. 'कर्मा' सारख्या सिनेमात एका क्रूर खलनायकाची भूमिका करणाऱ्या त्यांनी 'डॅडी', 'सारांश' सारख्या चित्रपटात अत्यंत भावपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर 'रामलखन' आणि 'लम्हे' सारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. 

२. ७ मार्च १९५५ साली अनुपम खेर यांचा जन्म शिमला येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनेता होण्याची इच्छा होती. पदवीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. १९७८ साली त्यांनी तिथे आपले शिक्षण पूर्ण केले आणि रंगमंचावर पदार्पण केले. 

३. १९८० च्या दशकात त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहात ते मुंबईला आले. १९८२ साली 'आगमन' या चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली खरी, पण, हा सिनेमा अयशस्वी ठरल्याने त्यांना नाव कमावता आले नाही. 

४. १९८४ साली अनुपम खेरना महेश भटांच्या 'सारांश' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. यात त्यांनी साकारलेली अकाळी मरणाऱ्या मुलाच्या बापाची भूमिका अजरामर ठरली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. 

५. १९८८६ साली सुभाष घईंच्या 'कर्मा' आणि 'खलनायक' मध्ये आपला दमदार अभिनय केल्याने त्यांनी आपली 'खलनायक' अशी ओळखही बनवली. 

६. आपल्या भूमिकांमध्ये आलेला एकांगीपणा घालवण्यासाठी त्यांनी १९८९ पासून आपल्या भूमिकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. १९८९ साली सुभाष घईंच्या 'राम लखन'मध्ये केलेल्या माधुरी दीक्षितच्या वडिलांच्या भूमिकेमुळे त्यांना विनोदी नटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 

७. १९८९ सालीच त्यांनी 'डॅडी' नावाचा एक आगळावेगळा सिनेमाही केला. त्यात त्यांनी केलेली भावूक भूमिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली. या अभिनयासाठी त्यांना फिल्म फेअर ज्यूरी अॅवॉर्ड आणि राष्ट्रीय पुरस्कारांचा स्पेशल ज्यूरी पुरस्कारही मिळाला.

८. २००३ साली 'ओम जय जगदीश' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. हा चित्रपट सशस्वी ठरला नाही. २००५ साली अनुपम खेर यांनी 'मैने गांधी को नहीं मारा' पण निर्मित केला. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना कराची फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला. 

९. अनुपम खेर यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. छोट्या पडद्यावरही त्यांची पसंती कमालीची वाढली. 'से ना समथिंग टू अनुपम अंकल' आणि 'सवाल दस करोड का' यासारख्या कार्यक्रमांचे निवेदनही त्यांनी केले. 

१०. अनुपम खेर यांना त्याच्या कारकीर्दीत आजवर आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षही झाले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालक पदाचा कारभारही त्यांनी २००१ ते २००४ या काळात सांभाळला. 

११. चित्रपट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या तीन दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.