मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
स्मिता तळवलकर एक उत्तम अभिनेत्री. दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून मराठी सिनेसृष्टीतली ओळख. कळत नकळत आणि तू तिथे मी या सिनेमांसाठी त्यांनी दोन राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी पटकावलेत. त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर..
तेजस्वी चेहरा. त्या चेह-यावर कायम हसू आणि सहजसुंदर अभिनय अशीच छबी मराठी सिनेसृष्टीत आहे ती अभिनेत्री स्मिता तळवलकरची. खरं तर सिनेसृष्टीत येण्याआधी जवळपास १७ वर्ष वृत्तनिवेदीका म्हणून त्यांनी काम केलं. 1986 साली गडबड घोटाळा आणि तू सौभाग्यवती हो या सिनेमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केलं ते एक अभिनेत्री म्हणून. त्यानंतर 1889साली आपल्या स्वत:च्या बॅनरखाली अर्थातच अस्मिता चित्र निर्मित कळत नकळत या सिनेमाची निर्मिती केली आणि त्यानंतर स्मिता तळवलकर यांनी मागे वळू पाहिलंच नाही.
चौकट राजा, सवत माझी लाडकी,तू तिथे मी, सातच्या आत घरात, आनंदाचे झाड अशा सिनेमांची निर्मिती या अस्मिता चित्रने केली त्यात चौकट राजा आणि कळत नकळत या सिनेमांना राष्टीय पुरस्कारही मिळाले...एक अभिनेत्री म्हणून स्मिता तळवलकर यांनी जवळपास १२ सिनेमांमध्ये काम केलं...( टोपी घाला रे, शिवरायाची सून ताराराणी, चेकमेट, अडगुळ मडगुल, जन्म, एक होती, वादी, श्यामची आई, या गोल गोल डब्ब्यात, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, भातुकली )मात्र चौकट राजा या सिनेमातली एका मंतिमंद मुलाची मैत्रिण म्हणून साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षक आजही विसरू शकत नाहीत.
सिनेमांप्रमाणेच अस्मिता चित्रने छोट्या पडद्याच्या माध्यमातूनही लोकांचं मनोरंजन केलं. घरकुल, पेशवाई, अवंतिका, उन पाऊस, कथा एका आनंदीची, अर्धांगिनी, सुवासिनी. मात्र हे सारं होत असतानाच कर्करोगासारख्या रोगानेही स्मिता तळवलकर यांच्यावर अधिराज्य गाजवलं. त्यातूनही हार न मानत त्याच्याशी लढा देत त्या उभ्या राहिल्या आणि ब-याच वर्षांनंतर त्यांनी रंगंचावर एन्ट्री करत दुर्गाबाई जरा जपून या नाटकातही भूमिका सादर केली.मात्र देवाच्या मनात काही वेगळंच होतं. कर्करोगाशी लढा देतानाच त्यांना अखेर मृत्यूला सामोरं जावं लागलं. ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.