मुंबई : आकाश ठोसर लवकरच दुसऱ्या चित्रपटात दिसणार हे तुम्हाला माहीत झाले असेलच. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाचा हिरो आकाश ठोसर अर्थात 'सैराट'मधील परशा असणार आहे. त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री काम करणार याची उत्सुकता शिगेला लागलेय.
'सैराट' चित्रपटात आकाश आणि रिंकूची केमिस्ट्री तर इतकी जुळून आली होती की त्यांच्या सगळ्या चाहत्यांना ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पहायला नक्कीच आवडेल. मात्र रिंकूचे दहावीचे वर्ष असल्याने तिला अभ्यासाकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे या चित्रपटात त्याची अभिनेत्री म्हणून आता कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सगळ्यानाच लागलीये.
कोण आहे ही अभिनेत्री
महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटात आकाशसोबात अभिनेत्री माधुरी देसाई दिसणार आहे. तशी माहिती हाती आली आहे. 'येक नंबर' या मालिकेने माधुरीला प्रसिद्धी मिळाली होती. आता ती चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.
या चित्रपटाची कथा आजच्या तरुणाईचे राहणीमान आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत यावर भाष्य करणारी असणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘फू’ या चित्रपटात त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर, आकाश ठोसर, माधुरी देसाई आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार असणार आहेत.