मुंबई : यंदा १२ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर वर्षातील सगळ्यात मोठ्ठं 'सिनेमा वॉर' पाहायला मिळणार आहे.
आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित आणि हृतिक रोशन स्टारर महत्त्वाकांक्षी असा 'मोहन्जोदारो' आणि अक्षय कुमारचा मच अवेटेड 'रुस्तम' हे दोन्हीही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा रसिकांना बघायला मिळणार होती.
मात्र, आता आशुतोष गोवारिकर आपल्या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे. कारण 'रुस्तम'चा ट्रेलर सोशल साईट्सवर हिट झाला आहे. तसेच अक्षय कुमारचे सध्या सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसतायत. त्यामुळे आशुतोष गोवारीकरच्या शुभचिंतकांनी त्याला त्याच्या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे.
मात्र, आशुतोषला आपल्या सिनेमावर पूर्ण विश्वास असून त्याने १२ तारखेलाच आपला सिनेमा प्रदर्शित करण्याचा हट्ट धरला आहे. त्यामुळे खिलाडी कुमार समोर क्रिश हार मानतो का? हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.