कपिल देशपांडे, मुंबई : अनेक जुनी गाजलेली नाटकं सध्या नव्या रुपात रंगमंचावर येऊ लागली आहेत..नव्या कलाकारांसह तांत्रिकदृष्ट्या अपग्रेड होऊन आलेली ही नाटकं चांगलं बुकिंग मिळवताये..तसेच जुन्या कलाकृती नव्या पिढीशी कनेक्ट होण्यासाठी अशी गाजलेली नाटकं पुन्हा पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहेत. एक अशीच कलाकृती तब्बल 20 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर दाखल होतेय.
ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी, अविनाश खर्शीकर यांच्या अभिनयाने नटलेले वसंत सबनीस लिखीत 'सौजन्याची ऐशी तैशी' हे नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर येतयं. केदार शिंदे नाटकाचं दिग्दर्शन करणार असून रसिकांचा राजा भरत जाधव नाटकात धमाल भूमिकेत दिसणार आहे.
'सौजन्याची ऐशी तैशी' या फार्सिकल विनोदी नाटकाचा पहिला प्रयोग 1974 साली झाला होता... आता हेच नाटक नव्या ढंगात नव्या रुपात केदार आणि भरतची जोडी घेऊन येतेय.
दिवाळी पहाट म्हटली की आपल्याला फक्त गाण्यांचेच कार्यक्रम आठवतात. यंदा मात्र 'सौजन्याची ऐशी तैशी' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दिवाळी पहाटच्या निमित्ताने शनिवारी डोंबिवलीत सकाळी साडे सहा वाजता होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच नाटकाचा प्रयोग 'दिवाळी पहाट'च्या रुपात करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आलाय.
मोहन वाघ यांच्या 'चंद्रलेखा' या संस्थेचा ताबा सध्या वर्षभरासाठी अजित भुरे यांच्याकडे आहे. वाघ यांची वेगळ्या वेळी नाटकाचा प्रयोग लावण्याची परंपरा कायम ठेवत भुरे यांनी दिवाळी पहाटला नाटकाचा प्रयोग आयोजित केलाय.
नाटकात स्मिता गोंदकर, कांचन पगारे, मयुरेश पेम आणि कमलाकर सातपूते यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दिवाळीच्या निमित्ताने हे नाटक रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. आता हे नाटक जुन्या नाटकासारखंचं रसिकांच्या मनावर गारुड घालेल का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.