मुंबई : अवघ्या महाराष्ट्राने ज्या मराठी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलय त्याचं आकर्षण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या 'मातोश्री' ला कसे नसेल? गुरुवारी 'सैराट'च्या टीमने केलेल्या वारीने 'मातोश्री'च वातावरण एकदम झिंगाट झाले.
आधी साहेब आले, मग आर्ची आली आणि पाठोपाठ पर्शा आला...मग अख्खी टीम आली. फ्लॅशचा झिंगझिंगाट झाला.. कौतुकाची फुलं हातात आणि आशिर्वादाची शाल पाठीवर आली. शेवटी पुन्हा साहेबांच्या सगळ्या परिवाराने कौतुक केलं. हे सगळं सांगायला हवं कारण, सैराटच्या टीमचं कौतुक गुरुवारी मातोश्रीवर झालं. राज्यातल्या एका बलाढ्य संघटनेच्या प्रमुखानं सैराटच्या टीमला भरभरून आशीर्वाद दिले.
'मातोश्री'ची पायरी चढण्याचा असा योग जुळून येइल असं या कुणाला कधी वाटले नसेल. हे सगळं झालं ते सैराटच्या घवघवीत यशामुळे. शिवाय यश मिळवूनही कसलाही बड़ेजाव ना आर्चीत होता, ना पर्शात न प्रिंससकट इतर कुणात. सगळे मनापासून कौतुक स्वीकारत होते आणि करणाऱ्याच्या पाया पडत होते.
कारण, कौतुकाची थाप कलाकारासाठी किती मोलाची आहे हे त्यांनी ओळखलं आहे.सैराटमध्ये अभिनय केलेल्या या सिताऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंना भेटता आलं नसेल, पण त्यांची मातोश्री सर्वानी याचि देहि याचि डोळा पाहिली.
सैराटचं गारुड फक्त 'मातोश्री'लाच आहे असं नाही. तर तिथे ड्यूटीवर हजर असलेल्या प्रत्येकावर या सिनेमाची झिंग दिसून येत होती. मातोश्रीच्या बाहेर सैराटच्या कलावंतासोबत सेल्फ़ी काढण्यासाठी पोलिसांचीही चढाओढ सुरु होती. सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या या साऱ्या कलावंतांची ही लोकप्रियता खरंच स्वप्नवत आणि अद्भुत आहे.