तेजश्रीच्या 'ओली की सुकी'चा ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवण्यात यशस्वी झालेल्या 'ओली की सुकी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Updated: May 9, 2017, 07:45 PM IST
तेजश्रीच्या 'ओली की सुकी'चा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवण्यात यशस्वी झालेल्या 'ओली की सुकी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित ट्विस्टला 'विषय गंभीर तिथं खंबीर' होत सामोरे जाणाऱ्या स्टायलिश 'रावडी गँग'ची हजरजवाबी बोल-बच्चनगिरी या ट्रेलरमधून अनुभवायला मिळते. आयुष्याची नवीन सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही म्हणणारी ही 'रावडी गँग' हसत खेळत आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन अतिशय मनोरंजक पद्धतीने या चित्रपटातून देणार आहे, याची खात्री ट्रेलर बघून होत आहे.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली येणाऱ्या प्रत्येक संकटाला आत्मविश्वासपूर्वक परतवून लावण्याची भाषा बोलणारी अतरंगी मुले, अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची त्यांच्याप्रती असणारी तळमळ यामुळे चित्रपटा विषयीची उत्सुकता वाढत आहे. तेजश्री प्रधानसह या चित्रपटात वर्षा उसगावकर, भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे, सुहास शिरसाट, बालकलाकार चिन्मय संत आणि १० ते १२ बाल-कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

आनंद गोखले लिखित व दिग्दर्शित आणि वैभव जोशी निर्मित 'ओली की सुकी' हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.