मुंबई : रईस चित्रपटाचा सहनिर्माता फरहान अख्तरनं लष्कराला पाच कोटी रुपये द्यायच्या मनसेच्या मागणीला विरोध केला आहे. लष्कराला पाच कोटी रुपये देणार नाही, असं फरहान अख्तरनं स्पष्ट केलं आहे. फरहान अख्तरच्या या भूमिकेवर मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे.
रईसच्या रिलीजची तारीख जवळ येऊ दे, मग बघू असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले आहेत. मुख्यमंत्री, राज ठाकरे आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये हा निर्णय झाला तेव्हा फरहान अख्तर कुठे होते, असा सवालही अमेय खोपकर यांनी विचारला आहे. मिड डे या इंग्रजी वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. फरहानचं वक्तव्य आणि मनसेच्या भूमिकेमुळे रईस चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीही हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
फरहान अख्तरच्या रईस या चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत आहे. तर पाकिस्तानी कलाकार माहिरा खानही या चित्रपटामध्ये आहे. करण जोहरच्या ऐ दिल है मुश्कील चित्रपटामध्ये फवाद खान असल्यामुळे मनसेनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि निर्माता करण जोहर यांच्यामध्ये मध्यस्ती केली. करण जोहरनं लष्कर कल्याण निधीला पाच कोटी रुपये मदत देण्याचं आश्वासन दिलं. इतर निर्मात्यांनीही यापुढे पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर ऐ दिल है मुश्कीलच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला.