देशात विवाहपूर्व सेक्सचा आनंद उपभोगणाऱ्यां पैकी फक्त सात टक्केच स्त्रिया तर २७ टक्के पुरुष कंडोमचा वापर करत असल्याचं एका अभ्यासात निष्पन्न झालं आहे. देशातील युवकांना संतती नियमना संबंधी साधनांची अधिक चांगल्या प्रकारे उपलब्धतेची आवश्यकता असल्याचं या अभ्यासामुळे समोर आलं आहे. पॉप्युलेशन काऊन्सिलने विवाहपूर्व सेक्सचा आनंद घेणाऱ्या १५ ते २४ वयोगटातील २४०८ विवाहीत आणि अविवाहित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या त्यात ही आकडेवारी समोर आली आहे.
या निष्कर्षांमुळे तरुण स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत विवाहपूर्व सेक्सचा आनंद घेताना कंडोमचा वापर कमी प्रमाणात करतात हे सिध्द झालं आहे. कंडोम विकत घेण्यात येणारे अडथळे तसंच मेडिकल दुकानांमध्ये कंडोम मागण्यात येणारं अवघडलेपण ही काही कारणं यामागे आहेत. तसंच ग्रामीण भागात कंडोमच्या उपलब्धतेतल्या मर्यादा, माहितीचा अभाव ही देखील प्रमुख कारणं आहेत. आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, राजस्थान आणि तमिळनाडूतील ग्रामीण आणि शहरी भागात हा अभ्यास करण्यात आला आहे. युवकांसाठी कंडोमच्या वापरा संदर्भात उपलब्धता आणि माहितीचे प्रसारणासाठी नव्या पध्दतीची गरज त्यामुळे अधोरेखित होते. कंडोमच्या वापराला प्रोत्साहन देणारे बोल्ड आणि कल्पक कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे.