चंदीगढ: महाराष्ट्रासोबतच आज हरयाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. इथं भाजपचा भगवा फडकण्याची चिन्हं आहेत. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांपैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी असून भाजपला पूर्ण बहुमत मिळालंय. देशातील सत्ता गमावल्यामुळं राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसला हा जबरदस्त मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसमुक्त भारताची हाळी देत केंद्रात भाजपची सत्ता आणल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसशासित राज्यांवर लक्ष केंद्रित केलं होतं. आकारानं लहान तरीही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं हरयाणा हे त्यापैकी एक राज्य होतं. हरयाणातील सत्तेतून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथं जातीनं लक्ष घातलं होतं. हरयाणात आधीच सत्ताविरोधी लाट होती. त्या लाटेवर स्वार होऊन भाजपनं जोरदार प्रचार केला. हरयाणा सरकार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यातील संशयास्पद जमीन व्यवहारांवर भाजपच्या प्रचाराचा रोख होता. त्याची ही रणनीती यशस्वी ठरली.
काँग्रेसबरोबरच हरयाणातील प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या इंडियन नॅशनल लोकदलाचं आव्हान भाजपपुढं होतं. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला यांना शिक्षक भरती घोटाळ्यात तुरुंगात जावं लागलं. या घडामोडी भाजपसाठी फायद्याच्या ठरल्या आणि त्यांचा सत्तेचा मार्ग सुकर झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.