एमआयएमच्या मनात आहे तरी काय?

विधानसभा निवडणुकीत औरंगाबादेत यश मिळाल्यानंतर आता एमआयएम औरंगाबादेत चांगल्याच मजबूत स्थितीत येत असल्याचं चित्र आहे. एमआयएमच्या यशानं काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची चिन्हं आहे.  

Updated: Oct 30, 2014, 08:57 PM IST
एमआयएमच्या मनात आहे तरी काय? title=

औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीत औरंगाबादेत यश मिळाल्यानंतर आता एमआयएम औरंगाबादेत चांगल्याच मजबूत स्थितीत येत असल्याचं चित्र आहे. एमआयएमच्या यशानं काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची चिन्हं आहे.  

विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर औरंगाबादेत एमआयएमनं असं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. या विजयामुळं एमआयएम पक्षाची पाळमुळं आता चांगलीच खोलवर रुजू लागलीयत. मुस्लिमबहूल परिसरात तर जणू एमआयएम तारणहार असल्याच्या भूमिकेत अवतरलाय.त्यामुळे इतर पक्षातल्या मुस्लिम नगरसेवकांना याची चांगलीच धडकी भरलीय. त्यामुळेच की काय आता जवळपास शहरातले सर्वच मुस्लिमनगरसेवक एमआयएममध्ये प्रवेशाची तयारी करत असल्याची माहिती मिळतेय. काँग्रेस, राष्ट्रवादी काही नगरसेवकांनी तर विधानसभा निवडणुकीत एमआयएमचा खुलेआम प्रचारही केला होता.. त्यामुळं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पारंपरिक मतदार गमवावा लागणार आणि पक्षाला मोठं भगदाड पडणार असं चित्र निर्माण झालंय. 

- औरंगाबाद महापालिकेत मुस्लिम नगरसेवकांची संख्या 23 आहे. त्यात काँग्रेसमध्ये 9 राष्ट्रवादीत 7 आणि 7 अपक्ष मुस्लिम नगरसेवक आहेत. 

- यातले बरेच नगरसेवक आणि काही नेते संपर्कात असल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलंय.

मात्र असं काहीही होणार नाही असा दावा काँग्रेस करतंय. तर महापालिका निवडणुकीत एमआयएमसहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडेल आणि शहरावर पुन्हा भगवा फडकेल असा विश्वास शिवसेना व्यक्त करतेय.

शिवसेनाच सत्तेत येण्याचा दावा करत असली तरी या सर्व परिस्थितीत एमआयएम मात्र चांगल्याच मजबूत स्थितीत दिसतोय. तसंचयेणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याची जबर किंमत मोजावी लागणार असंच चित्र या घडामोडीतून स्पष्ट होतंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.