परळी : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या सभांना राज्यात भरघोस प्रतिसाद मिळत आहे, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यात राज्याचं नेतृत्व करण्याची धमक असल्याचं म्हटलं आहे.
तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या मुलीला घेतले जाईल, या साठी आम्ही लोकसभेला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा उपयोग झाला नसल्याचं सांगितलं, ते गुरूवारी परळीत बोलत होते.
हिरे उद्योग हलवण्याचा डाव
सीबीआय चौकशीचा अहवाल प्रसिद्ध झाला असला, तरी संशयाची पाल कायम आहे, असे सांगतानाच मुंबईतील हिरे विक्रीचे केंद्र गुजरातला हलवून एक लाख मुलांना बेरोजगार करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
मुंडेंच्या अपघातावर काय म्हणाले पवार?
पवार म्हणाले की, काही वर्षांपूर्वी या भागाचे आमदार रघुनाथराव मुंडे यांचाही अपघाती मृत्यू झाला. तो कसा झाला ते समजले नाही. या भागाचे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा नवी दिल्लीत अपघात झाला. या बाबतही लोकांच्या मनात संशय कायम आहे.
मोदींना पत्र लिहलं आहे
पंतप्रधान मोदींना आपण पत्र लिहून मुंडेंच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध झाल्याचे आज वर्तमानपत्रांत वाचले. मात्र, मनात शंकेची पाल कायम आहे. या दोन्ही नेत्यांना जनतेने स्वीकारले होते. पण त्यांचा अपघातात मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.