मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठं गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असून त्यांना श्रद्धांजली म्हणून शिवसेनेवर टीका करणार नाही अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तासगावमधील सभेत मांडली होती. मोदींच्या या विधानाचा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. युती तुटल्यावर श्रद्धांजली दिल्यानं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 'बूंद से गयी...’हा विचार येऊ शकतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्राला लुटलं हे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रात आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईत येऊन मुंबईतील उद्योगपतींनी मुंबईत थांबू नये, गुजरातमध्ये चला असं आवाहन करतात. ही देखील महाराष्ट्राची लूट असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्र तोडण्यासाठी भाजप निवडणुकीत उतरलं असून शेठ - सावकारांच्या सट्टाबाजारातील पैसा या निवडणुकीसाठी वापरला जात आहे असा आरोपही ठाकरेंनी केला.
शेळपटांना शिवरायांचे आशीर्वाद कसे मिळणार ?
कर्नाटकमधील सीमाभागात मराठी जनतेवर अत्याचाराच्या टाचेखाली चिरडलं जात असून शिवछत्रपतींचा आशीर्वादवाले महाराष्ट्रात येऊन त्यावर काहीच बोलत नाही, असं उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधलं आहे. केंद्रात भाजपची सरकार असून कानडी अत्याचाराविरोधात लोकसभेत राज्यातील भाजप खासदार गप्प बसून होते. अशा शेळपटांना शिवछत्रपतींचे आशीर्वाद कसा मिळणार असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.