ऑडिट विधानसभा मतदारसंघ - बल्लारपूर, चंद्रपूर

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ. मुनगंटीवार यांनी बल्लारपूरमधून चारवेळा आमदारकी भुषवली आहे. मुनगंटीवार यांचा विजयाचा हा महामेरू रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Updated: Oct 1, 2014, 07:25 PM IST
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - बल्लारपूर, चंद्रपूर  title=

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ. मुनगंटीवार यांनी बल्लारपूरमधून चारवेळा आमदारकी भुषवली आहे. मुनगंटीवार यांचा विजयाचा हा महामेरू रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

 

महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेला बल्लारपूर मतदारसंघ सध्या ओळखला जातो, तो राज्यातील सर्वात शेवटच्या मोठ्या रेल्वे स्थानकाच्या नावाने.  राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग असलेल्या या भागाने राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. मारोतराव कन्नमवार यांच्यासारखा आमदार दिला आहे. पण सध्या या मतदारसंघाची ओळख आहे ती सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने.

या मतदारसंघात सुमारे २ लाख ९४ हजार ६७० मतदार आहेत. २००९ साली भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी विजयश्री खेचून आणली होती. या निवडणुकीत मुनगंटीवर यांना ८६ हजार १९६  एवढी मत मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांना   ६१ हजार ४६० एवढी मत मिळाली होती. या निवडणुकीत मुनगंटीवार यांना २४ हजार ७३६ एवढे मताधिक्य मिळालं होतं.

किती झालीत विकासकामे?
 ५० कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्यांची बांधणी, महाआरोग्य शिबिरांचे आयोजन, खनिज विकास निधीची रक्कम पाणीपुरवठा योजनांसाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय, मुल व बल्लारपूर या २ शहरात २ प्रशस्त नाट्यगृहे, प्रत्येक तालुक्यात वाचनालयाची निर्मिती, राज्यातील पहिल्या मोबाईल कार्यालयाची निर्मिती, गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापिठाची निर्मितीसाठी विशेष प्रयत्न, सिंचन योजनांसाठी निधी आणल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केलाय. चंद्रपुरप्रमाणेच बल्लारपुरातही विकासकामांचा धडाका लावल्य़ाचे ते म्हणतात.
 
मतदारसंघातील समस्या
जंगल क्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागलाय , पण उपाययोजना मात्र शून्य आहे. उद्योगांची वानवा दिसत आहे. सिंचन सोयी नाहीत, बेरोजगार हातांना काम नाही , बल्लारपूर शहरातील पेपर मिलचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. आमदार विकासकामांचा दावा करत असले तरी त्यांनी मतदारसंघातील सिंचन सोयी वाढविण्यासाठी काहीही केलेले नाही अशी टीका विरोधक करत आहेत. 

नुकत्याच झालेल्या मोदी लाटेच्या निवडणुकीत चंद्रपूरच्या सर्वच ६ मतदारसंघात भाजपला मोठ्या फरकाची आघाडी आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अहिर यांना २९ हजार ७५४ ची आघाडी दिली आहे. अर्थात यामुळे आ. मुनगंटीवार यांची क्षेत्रातील पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 

गेली २० वर्ष काँग्रेसला या सत्तेपासून वंचित ठेवणारा हा मतदारसंघ यंदा राष्ट्रवादीला सोडावा, अशी मागणी होत होती. आता तर प्रत्येक पक्ष निवडणुकीत उतणार असल्याने मुनगंटीवारांची राज्यस्तरावरील प्रतिमेला आव्हान देत प्रचार करण्याचे मोठे आव्हान यावेळेलाही विरोधी उमेदवाराकडे असणार आहे. आणि यावरच प्रचाराच्या धुरळ्याची उंचीही ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.