ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बीड

बीड विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या सुनील धांडेंचा पराभव केला होता. राजकीय समीकरणांबरोबरच जातीची समीकरणं इथे नेहमीच प्रभावी ठरतात. 

Updated: Oct 7, 2014, 09:35 PM IST
 title=

बीड : बीड विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या सुनील धांडेंचा पराभव केला होता. राजकीय समीकरणांबरोबरच जातीची समीकरणं इथे नेहमीच प्रभावी ठरतात. 

राजकियदृष्ट्या चर्चिला जाणारा मतदार संघ म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ… बीडचा इतिहास अगदी पुराणकाळापर्यत जातो. पांडवकालात दुर्गावतीनगर आणि चालुक्यकालात चंपावतीनगर अशा अनेक आख्यायिका रुढ होऊन बीडची वाढ होत गेली.

सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेले हे बीड.. मुंडेचा बीड आणि बीडमध्ये राष्ट्रवादीमुळे हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत चर्चेत आला.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -       
शिवसेना - अनिल जगताप    
राष्ट्रवादी - जयदत्त क्षीरसागर
मनसे - सुनील धांडे

२००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयदत्त क्षिरसागर विजयी झाले होते. क्षिरसागर यांना १ लाख ९१ हजार १६३ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या सुनील धांडे यांना ३३ हजार २४६ मते मिळाली होती. जयदत्त क्षिरसागर यांना ७५ हजार ९१७ चे मताधिक्य मिळाले होते.

पण लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात भाजपला ८४ हजार ८२६ मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला ८० हजार ९४१ मते मिळाली होती. भाजपच्या मुंडेनी याच मतदारसंघातून ३ हजार ८८५ मताधिक्य मिळालं होतं.

लोकसभा निकालानंतर सगळीच गणीत बदलली असली तरी विजय आपलाच आहे हा विद्यमान आमदार जयदत्त क्षिरसागर यांचा दावा आहे.

क्षीरसागर यांनी मागील पाच वर्षात डीपीडीसी , स्थानिक विकास निधी, एमएसआरडीसी, अशा वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास ५०० कोटी रुपयांचा निधी आणला. 

नवे तालुका स्टेडीयम, बस स्थानक,जिल्हा न्यायालयाची इमारत,नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतीसाठी प्रयत्न

चौसाळा, गेवराई, रायमोहा येथे शाळेच्या इमारती यासाठी प्रयत्न केले.  पाठपुराव्यामुळे नगर बीड परळी रेल्वे प्रकल्प मार्गी लागला. 
खेचून आणलेला विकास निधी आणि झालेली कामे या पेक्षा मुंडे यांच्या मृत्यू नंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि ती ते कशी रोखतात हेच खरे आव्हान आहे.

या मतदार संघावर शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी दावा केलेला असला तरी जिल्ह्यातील एकमेव मतदार संघ शिवसेना सोडेल असे वाटत नाही . त्यातमच मतदारसंघातील समस्यावरुन आता राजकारण रंगतंय.
 
- मागील पाच वर्षात बीड मतदार संघात उड्डाण पूल झाला नाही,
- राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी व्हावेत म्हणून जाहीर केलेला बायपास झाला नाही, 
- सिंचन प्रकल्प होवू शकले नाहीत,
- वाहतुकीची कोंडी अद्यापही कायम आहे , 
- ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था आहे , 
- मोठे उद्योग आले नाहीत , 
- बीड मतदारसंघात पालकमंत्री यांनी काहीच विकास केला नाही असा आरोप शिवसेनेने केला आहे.

बीड मतदार संघातील लढत रंगतदार होईल, क्षीरसागर यांनी पैसा आणला मात्र विकास दिसत नाही त्यामुळे मागील प्रमाणे त्यांना निवडणूक सोपी नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले. 

बीड मतदार संघातील जातीय समीकरणांचा अभ्यास केल्यास हा मतदार संघ ओबीसी बहुल असा शहरी मतदार संघ आहे , नगर पालिका, जिल्हा परिषद , सहकारी साखर कारखाना, बँक,शिक्षण संस्था यांचे जाळे क्षीरसागर यांच्या कडे आहे  मात्र शिवसेनेने जोर लावल्यास क्षीरसागर यांना मेहनत दुप्पट घ्यावी लागेल यात शंका नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.