ऑडिट विधानसभा मतदारसंघ - भंडारा

 भंडारा विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर इथे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेच्या या लढाईत मित्रपक्षांच्या छुप्या हालचालीही तितक्याच महत्वपूर्ण ठरतात. 

Updated: Oct 1, 2014, 05:08 PM IST
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - भंडारा  title=

भंडारा  : भंडारा विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर इथे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेच्या या लढाईत मित्रपक्षांच्या छुप्या हालचालीही तितक्याच महत्वपूर्ण ठरतात.  

वैनगंगा नदीच्या काठावर वसलेलं भंडारा शहर. धान उत्पादकांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणा-या भंडा-यात विधानसभेचा रणसंग्राम आता पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सुरू झाला आहे. राजकीय नेत्यांची उमेदवारीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. 

भंडारा विधानसभा मतदारक्षेत्रात भंडारा आणि पवनी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. एकूण मतदारांची संख्या सुमारे तीन लाखांच्या आसपास आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेचे विजयी आमदार नरेंद्र भोन्डेकर यांना १ लाख ३ हजार ५८१ मते मिळाली. तर त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र गडकरी यांना ५२ हजार ३२६ मते मिळाली. एकूण ५१२५५ एवढ्या मताधिक्याने भोंडेकर विजयी झालेत.

आमदारांची विकासकामे... 
गोसेखुर्द प्रकल्पाला १२०० कोटी देण्यास सरकारला भाग पाडले., पवनी तालुक्यात MIDCसाठी पुढाकार, मतदारसंघात ठिकठिकाणी रस्ते दुरूस्ती , भंडारा, पवनीमध्ये गोदामांची व्यवस्था, शिवाजी स्टेडियमचे नुतणीकरण अशी विकासकामे केल्याचं आमदार भोंडेकर सांगतात. 

आमदारांच्या या विकासनाम्यावर विरोधक मात्र टीकास्त्र सोडताहेत. आमदारांनी इतरांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटू नये, असा टोला विरोधक लावताहेत.  

मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आणि भंडारा जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. पण भाजप-सेनेच्या नेत्यांमध्ये योग्य तो ताळमेळ दिसत नसल्याने आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही सतत कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याने इथला सर्वसामान्य माणूस विकासापासून दूर आहे. 

काय आहेत समस्या ?
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे., पिण्याचा पाण्याची समस्या कायम आहे., दूषित पाण्यामुळे लोक हैराण आहेत., शेतीसाठी सिंचनाच्या योजना नाहीत. त्यामुळे शेतकरी नाराज आहे., शहरातील नाल्यांची वेळेवर सफाई नसल्याने दुर्गंधी पसरते., ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे जनता हैराण आहे. 

गेल्यावेळी पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे महेंद्र गडकरी उत्सुक आहेत. मात्र मित्रपक्ष म्हणवणा-या काँग्रेसकडून त्यांना कितपत साथ मिळेल, यात शंका आहे. तर शिवसेनेच्या या जागेवर भाजपचाही डोळा आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारांसाठी हीच खरी डोकेदुखी असणार आहे. याकामी विकासाबरोबरच जातीची समीकरणं प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने आता इथला राजकीय रणसंग्राम अधिक जोर धरू लागलाय. मात्र आघाडी असो की युती कोण कुणाला कशी साथ देताहेत, यावरच इथली विजयाची समीकरणं अवलंबून असतील यात शंका नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.