नाशिक : नाशिक मध्य विधानसबा मतदारसंघ वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आहे. ज्या मनसेनेने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा आधार घेत नाशिक पालिकेत आपली सत्ता राखण्यास यश मिळविले आहे. राष्ट्रवादी-मनसेची झालेली महापालिकेतील अजब युती. या नव्या समीकरणांमुळे यावेळची विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगणार आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार वसंत गीते आहेत.
हार्ट ऑफ द सिटी, असं ज्या मतदारसंघाचं वर्णन केलं जातं असा हा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर नाशिकचे काही महत्वाचे शिलेदार ठामपणे त्यांच्या पाठिमागे उभे राहिले. यात वसंत गीते हे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. मात्र मधल्या काळात गीते यांची पक्षातली नाराजी वाढली आणि गीते मनसे सोडणार, अशीही जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र स्वतः राज ठाकरे यांनी यात लक्ष घालून गीतेंची नाराजी दूर केली.
नाशिकचे शिवसेनेचे माजी महापौर ते आमदार असा प्रवास करणाऱ्या गीते यांनी तत्कालीन आरोग्य राज्य मंत्री शोभा बच्छाव, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील बागुल यांचा पराभव करत या मतदारसंघावर आपलं नाव कोरलं. अटीतटीच्या या निवडणुकीत गीते यांना ६२ हजार १६७, काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना ३० हजार ९९८ तर शिवसेनेच्या सुनील बागुल यांना २७ हजार ७८६ मत मिळाली होती. गीते यांनी ३१,१६९ च्या मताधिक्याने विजय मिळवला.
गितें यांनी काय केलीत विकासकामे?
आमदारकीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात विशेष निधीतून २४ कोटी १७ लाख रुपयांची विकासकामे केल्याचं गीते सांगतात. यामध्ये १०० खाटांचं महिलांसाठी रुग्णालय, मध्यवर्ती बस स्थानकाचं नुतनीकरण, योगा हॉलची उभारणी, पिकअप शेडची उभारणी, निरीक्षण गृहातील मुलांसाठी सोलर वॉटर हिटर, जॉगिंग ट्रॅक, बेरोजगारांना रोजगार यांचा समावेश आहे.
नाशिकचे विद्यमान आमदार गीते यांनी मोठे प्रकल्प आणायला हवे होते. मात्र ते आणले गेले नाही, अशी टीका गीतेंवर विरोधक करताहेत. तर नाशिकचा राजकीय आखाडा गेल्या काही दिवसात राज्यभर गाजतोय. राजकारणाच्या या साठमारीत सर्वसामान्य नाशिककरांच्या समस्या आहे तशाच आहेत.
काय आहेत समस्या?
रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. शहरातील पार्किंगची समस्या आहेत. तर जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीत, युवकांना रोजगार नाही, अशी येथील परिस्थिती आहे. आदी अनेक समस्यांचा नाशिककर सामना करतायेत. महापालिकेत जमलेली नवी समीकरणं आणि लोकसभेत मनसेला बसलेला फटका या सगळ्या पार्श्वभूमीवर येणारी विधानसभेची निवडणूक मनसेसाठी आव्हानात्मक असणार असल्याचं विश्लेषक सांगताहेत.
नाशिकच्या या राजकीय आखाड्यात आता सगळेच पक्ष जय्यत तयारीला लागलेत. जनता कुणाच्या पाठिशी आहे आणि कुणावर विश्वास दाखवते याकडेच आता सगळ्यांच्या नजरा लागल्यायेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.