ऑडिट विधानसभा मतदारसंघ - नांदगाव, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ इथे विद्यमान आमदार आहेत. पाच वर्षांतली विकासकामे आणि आगामी निवडणुकीत पंकज भुजबळ यांच्यापुढे काय आव्हानं असणार आहे. 

Updated: Oct 2, 2014, 11:37 AM IST
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - नांदगाव, नाशिक title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ इथे विद्यमान आमदार आहेत. पाच वर्षांतली विकासकामे आणि आगामी निवडणुकीत पंकज भुजबळ यांच्यापुढे काय आव्हानं असणार आहे. 

नांदगाव मतदार संघ हा एकेकाळी काँग्रेस आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे  बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी  आपले वजन  वापरून आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या  कोट्यात  असलेली  नांदगावची  जागा  राष्ट्रवादीला घेतली आणि पंकज भुजबळ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. शिवसेनेचे संजय पवार आणि राष्ट्रवादीचे पकंज भुजबळ यांच्यात झालेल्या सरळ लढतीत पंकज भुजबळ यांनी संजय पवारांचा २१ हजार एवढ्या मताधिक्याने पराभव केला. 

काय झाली आहेत विकासकामे?
नांदगाव पूल, माणिकपुंज धरण पाणी योजना, १३ एक्कर जागेत उभारलेले  मिनी सचिवालय, मनमाडसाठी ३९ कोटींची पाणी योजना, गावागावात अंगणवाड्या,पाझर तलाव ,गरिबांसाठी घरकूल योजना आदी अनेक विकासाच्या योजना राबविल्याने यावेळीही विजय आपलाच होईल, असा विश्वास पंकज भुजबळांना वाटतोय. 

पंकज भुजबळ यांनी तालुक्यातील जनतेला केवळ विकासाचे स्वप्न दाखवून निवडणूक जिंकली मात्र प्रत्यक्षात जनतेचा भ्रमनिरास केला, अशी टीका होतेय. गेल्यावेळी शिवसेनेकडून लढलेले संजय पवार राष्ट्रवादीत दाखल झालेत. तर आगामी विधानसभेसाठी सुहास कांदे यांनी जय्यत तयारी केली. त्यांनाच सेनेकडून उमेवारीही जाहीर झालेय. 

लोकसभा निवडणुकीत इथे भाजपाच्या हरिचंद्र चव्हाण यांना १ लाख ७२ मते मिळाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या  डॉ . भारती पवार  यांना अवघ्या ३६ हजार २६६ मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे आगामी निवडणूक राष्ट्रवादीला सोपी नसणार हे स्पष्ट आहे. 

राजकारणाच्या राजकीय रंगात नांदगाव मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होतंय. मनमाड शहराला २५ दिवसाआड पाणीपुरवठा झाला, आमदारांचा जनसंपर्क कमी, रोजगाराची कामे नाहीत यामुळे विद्यमान आमदारांविषयी संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. 

नांदगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार देणार यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. बाहेरचा उमेदवार नको, अशी भूमिका इथले स्थानिक नेते आता घेताना दिसताहेत. त्यामुळे पंकज भुजबळ पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले तर त्यांना स्थानिक नेते कितपत मदत करतील, याबाबत सध्यातरी शंकाच व्यक्त केली जातेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.