ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - मुक्ताईनगर

ऑडिट जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरचं. म्हणजे अर्थातच विधानसभेचे विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाचं.

Updated: Oct 7, 2014, 09:35 PM IST
 title=

जळगाव : ऑडिट जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरचं. म्हणजे अर्थातच विधानसभेचे विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाचं.

संत मुक्ताईची पावन भूमी असलेल्या कोथळी गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेलं मुक्ताईनगर हे तालुक्याचं ठिकाण, विदर्भाच्या सीमेला जोडणाऱ्या मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्यातील काही गावांचा या मतदारसंघात समावेश होतो. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -   
शिवसेना -चंद्रकांत पाटील
भाजप - एकनाथराव खडसे
काँग्रेस - योगेंद्र पाटील
राष्ट्रवादी - अरुण पांडुरंग पाटील
मनसे - राजेंद्र सांगळकर          

सुमारे २५ वर्षे काँग्रेसचा हा बालेकिल्ला. १९९० ते २००९ असं सलग पाचव्यांदा विजयी पताका फडकावत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी इथे भाजपचा गड बनवलाय. 

२००९ च्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना ८५ हजार ७०८  मते मिळाली. तर अड्व्होकेट रवींद्र पाटील यांना ६७ हजार ३१९ एवढी मते मिळाली. त्यामुळे गेल्यावेळी खडसे १८ हजार ३८९ मतांनी विजयी झाले.

गेल्या पाच वर्षात मतदार संघात १७२९ कोटींची विकासकामे केल्याचा दावा खडसे यांनी केलाय. 

एकनाथ खडसेंनी विकासकामांचा दावा केला असला तरी जनता मात्र विकासापासून वंचित आहे. 
- कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेचे काम रखडलंय
- मुक्ताईनगर उपसा योजना बंद आहे, 
- बेरोजगार तरुणांसाठी उद्योगधंदे नाहीत,
- उच्च शिक्षणाची सोय नाही 
- पिण्याच्या पाण्याच्या योजना नाहीत. 
- अशा समस्यांची उत्तरं आजही अनुत्तरीतच 

एकनाथ खडसे मोठ्या पदावर असूनही त्याचा मतदारसंघाला मात्र हवा तेवढा फायदा का झाला नाही, असा सवाल विरोधक उपस्थित करताहेत.

दरम्यान दिवसेंदिवस भाजपमध्ये सुरु असलेली अंतर्गत धुसफूस, त्यातच महायुती असली तरी शिवसेना आणि भाजपातील स्थानिक संबंध फार चांगले नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात खडसे यांच्यासमोर राष्ट्रवादीनेही उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उतरणे गरजेचे आहे.

मुक्ताईनगर मतदार संघात तापी पूर्णा सारख्या नद्या वाहतात, केळीपिक उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र सिंचनाची सोय नसल्याने, शेतकरी अडचणीत आहे.

पिकविम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. याचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची चिन्ह दिसू लागलीयेत. सर्वच राजकीय नेत्यांना याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार हे नक्की.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.