ऑडिट - बीड (लोकसभा मतदारसंघाचं)

बीडमध्ये यावेळी विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकही होवू घातली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे बीडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक 15 ऑक्टोबरलाच  होतेय. याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा लेखाजोखा बीड जिल्ह्यातील मतदारसंघांचा.

Updated: Oct 7, 2014, 09:33 PM IST
 title=

बीड : बीडमध्ये यावेळी विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकही होवू घातली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे बीडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक 15 ऑक्टोबरलाच  होतेय. याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा लेखाजोखा बीड जिल्ह्यातील मतदारसंघांचा.

बीड जिल्ह्यातील राजकीय बलाबल... 
बीड, मराठवाड्यातील औरंगाबादपाठोपाठ राजकीय दृष्ट्या एक महत्वाचा जिल्हा. बीडपासून ते दिल्लीपर्यंत ठसा उमटवणारे भाजप नेते गोपीनाथ मुंडे याच जिल्ह्याचे सुपूत्र. चाळीस वर्षांहून अधिक काळ राजकारणात घालवल्याने परिपक्व असं हे नेतृत्व एकाएकी निघून गेलं आणि हा जिल्हा जणू पोरका झाला.

आक्रमक शैली, धडाडीचं नेतृत्व आणि आव्हानांना खुलेपणाने सामोरं जाण्याची धमक..यामुळे गोपीनाथ मुंडे जिल्ह्यातच नव्हे तर देशपातळीवरही गाजले. मात्र मोदी सरकारमध्ये केंद्रीयमंत्रीपदी विराजमान होण्याअगोदरच त्यांची जीवनयात्रा संपली. 

अवघा देश हळहळला. त्यामुळे मुंडेंच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक कशी असेल याकडे अनेक राजकीय धुरिणांच्या नजरा लागल्यात. दुसरीकडे जिल्ह्यातील जनतेने राजकारणीतील अनेक स्थित्यंतरं पाहिली. 

मात्र सतत दुष्काळाच्या छायेखाली वावरणा-या इथल्या सर्वसामान्य जनतेला अनेकदा मिळाली ती फक्त राजकारण्यांची आश्वासनंच. नेते आले बहरले मात्र इथली जनता आजही अनेकदा उपाशीपोटी आशेच्या किरणांवरच जगते आहे.

बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा विचार करता जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ आहेत. यात सहापैकी पाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात तर एक भाजपकडे आहे. आष्टी, गेवराई, माजलगाव, बीड, केज राष्ट्रवादीकडे तर परळीची एकमेव जागा राखण्यात भाजपला यश मिळालंय. 

बीड जिल्ह्यातील विद्यमान आमदारांवर नजर टाकली असता

- आष्टीमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश धस विद्यमान आमदार आहेत.

- गेवराईमध्ये राष्ट्रवादीचेच बदामराव पंडित यांनी अमरसिंह पंडितांचा पराभव करत आमदारकी मिळवलीये.

- माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांनी भाजपच्या आर. टी.देशमुखांचा पराभव केला

- बीडमध्ये राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या सुनील धांडेंना पराभूत केले.

- केजमध्ये राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे विद्यमान आमदार आहेत.

- तर परळीमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या टी.पी. मुंडेचा पराभव करत विधानसभेत प्रवेश मिळवला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.